जालना । भारतात सद्या जातियवादी भावना भडकावण्याबरोबर द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एकात्मता व बंधुभाव वाढीस लागावा या उद्देशाने जालना शहरात दि. 14 नोव्हेंबर सोमवार रोजी प्रातिनिधीक स्वरूपात काँग्रेस पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली आहे. येथील हॉटेल अंबरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, युवा नेते अक्षय गोरंट्याल, माजी गटनेते गणेश राऊत, राम सावंत यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर या दरम्यान, सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या या यात्रेत लाखो लोकांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांची ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे. विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, राजकीय नेते आणि संघटनांनी सदरील यात्रेस जोरदार समर्थन दिलेले आहे. नांदेड येथे गुरूवार रोजी झालेल्या खा. राहुल गांधी यांच्या सभेस लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यातूनच जनता ही बंधुभाव, सामाजिक समता रूजविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे. देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी कामगारांचे प्रश्न प्रलंबित असतांना केंद्र आणि राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगीतले. सदर रॅली केवळ काँग्रेस पक्षा पुरती मर्यादीत नसून त्यात सर्व धर्मनिरपेक्ष संघटना आणि विचाराने प्रेरीत जनतेला सहभागी होता येणार आहे.
जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते दि. 16 नोव्हेंबर रोजी वाशिम येथील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी दि. 15 नोव्हेंबर रोजी मुक्कामी जात आहे. तत्पुर्वी जालना शहरामध्ये भारत जोडो यात्रा दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10: 30 वाजता छत्रपती संभाजी
महाराज यांचा पुतळा (मोतीबाग) ते मुक्तेश्वरद्वार, गणपती गल्ली, शनिमंदीर चौक, टाऊनहॉल, गांधीचमन, मस्तगड, मंमादेवी मंदीर, मुथा बिल्डींग, महाविर चौक या मार्गाने जावून मामा चौकात या रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे. सदर रॅलीत जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख व काँग्रेस पक्षाचे नेते तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश राहणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगीतले. या रॅलीत जालना शहरातील धर्मनिरपेक्ष विचाराशी बांधीत असलेल्या जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, माजी गटनेते गणेश राऊत आदींनी केले आहे.
पत्रकार परिषदेस अंजेभाऊ चव्हाण, संतोष देवडे, गणेश चांदोडे, शिवप्रसाद चितळकर आदींची उपस्थिती होती.