जालना । रोटरी क्लब ऑफ जालना सेंट्रल आणि जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी लहान मुलांसाठी आयोजित मोफत हृदयरोग निदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दिवसभरात 152 बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात हृदयात गंभीर दोष आढळून आलेल्या बालकांवर मुंबईच्या खारघर भागातील सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
मंठा चौफुलीवरील जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात जन्मजात हृदयाचे आजार असलेल्या 152 बालकांची तपासणी सत्य साई संजीवनी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. आशिष बानपूरकर, डॉ. संतोष वाडीले यांनी केली. यावेळी टू डी इको तपासणीही मोफत करण्यात आली. हृदयाचे आजार असलेल्या बालकांच्या पालकांना सल्ला व मार्गदर्शन करण्यात येऊन त्यांच्या पुढील मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली. तथापि, आज तपासणी करण्यात आलेल्यांपैकी शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर क्लबतर्फे लवकरच सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ञ डॉ. स्नेहल कुलकर्णी ह्या शस्त्रक्रिया करतील, अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. अनुप कासलीवाल यांनी दिली.
याप्रसंगी रोटरी क्लब जालना सेंट्रलचे अध्यक्ष गिरीश गिंदोडीया, सचिव डॉ. आशुतोष सोनी, प्रकल्प प्रमुख डॉ. अनुप कासलीवाल, डॉ. हितेश रायठठा, डॉ. सागर गंगवाल, डॉ. नीलेश सोनी, राहुल तोतला, डॉ. अरविंद सोनी, डॉ. मनिष राठी, डॉ. भूषण मणियार, डॉ. राजीव जेथलिया, सचिन लोहिया, सीए सागर कावना, भरत गादीया, आदेश मंत्री, उमेश बजाज, नितीन नवलखा, किशोर पंजाबी, परेश रायठठा व जालना क्रिटिकल हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.