जालना । लाल मातीतील तळागाळात खेळला जाणारा पारंपारिक कबड्डी खेळ वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा उभारी घेत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून प्रशिक्षकांनी गाव पातळीवर कबड्डीपटू घडवत कबड्डीला गत वैभव प्राप्त करून द्यावे.असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी केले.
मिशन 132 के.व्ही. अंतर्गत वसुंधरा फाउंडेशन तर्फे कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षकांसाठी सुरू असलेल्या पायाभूत प्रशिक्षण शिबिराचा शुक्रवारी ( ता. 03) उत्साहात समारोप झाला. याप्रसंगी नवलकर बोलत होते. यावेळी राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे, इंदरचंद तवरावाला, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अनिकेत म्हात्रे, डॉ. केतन गायकवाड, ज्ञानदेव पायगव्हाणे, सौ. सुषमा पायगव्हाणे, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. मनीषा पायगव्हाणे- काटकर, शिबिर प्रमुख प्रा. सुभाष देठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंदरचंद तवरावाला यांनी कबड्डी असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. रमेशचंद्र तवरावाला यांच्याप्रमाणे कबड्डी खेळाच्या विकासासाठी आपले सहकार्य कायम राहिल अशी हमी दिली.
मंगल पांडे, ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी शुभेच्छा दिल्या. सहभागी प्रशिक्षक, शिबिरार्थींनी शिबिरातील अनुभव कथन केले.
सुञसंचालन संजय येळवंते यांनी केले तर शिबिर प्रमुख प्रा. सुभाष देठे यांनी आभार मानले. या वेळी प्रशिक्षक बी. जे. पाटोळे,संतोष नागवे, राजाभाऊ थोरात, अंबादास गीते, दिनेश वाघ, विठ्ठल दिवटे, प्रदीप राठोड, अमोल पवार, गोपाल पायगव्हाणे यांच्या सह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.