अर्थव्यवस्था बळकटीसाठी अनुदानाच्या योजनांतून सरकारचा सहभाग काढावा लागेल: ना. रावसाहेब दानवे

उद्दघाटन सोहळा: मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 45 व्या राष्ट्रीय अधिवेशनास प्रारंभ

23

जालना । अन्नधान्य, खते, विविध अनुदानाच्या योजना राबविताना जास्त दराने खरेदी करून अल्प दरात जनतेला उपलब्ध करून द्याव्या लागतात. काही पक्ष वीज, पाणी, फुकट देण्याच्या घोषणा करतात, याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोय. आज जगात पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी घरापासून सुरुवात करावी लागेल याकरिता प्रत्येकाने कार्यक्षमता वाढवावी तसेच अनुदानाच्या योजनांत सरकारचा सहभाग राहणार नाही अशी व्यवस्था तयार करावी लागेल,तेव्हाच अर्थव्यवस्था मजबूत होईल. असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी आज केले.

जे. ई. एस. महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 45 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी ( ता. 05) ना. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. आर. बी. भांडवलकर हे होते. आ. प्रताप अडसड, भास्करराव दानवे ,जे.ई.एस.चे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रोफेसर डॉ. अविनाश निकम, संचालक तथा कार्यवाह प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने, खजिनदार डॉ.मारोती तेगमपुरे ,अर्थसंवाद चे संपादक डॉ.राहुल म्होपरे, माजी अध्यक्ष डॉ .अनिल सूर्यवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी प्रारंभी खुमासदार शैलीत रोज हिशोब लिहिणारे फसतात म्हणून आपण डायरी न ठेवता सरळ मार्गाने खर्च करत असल्याचे सांगून एकच हशा पिकविला.
हल्ली महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढली असली तरी विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले, केवळ शहरातील विद्यार्थीच शिकत असून राजकारणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गळतीस पालकच जबाबदार असल्याचे ना. दानवे यांनी नमूद केले. विद्यार्थीच नसतील तर प्राध्यापकांचे ज्ञान व्यर्थ जाईल असा धोकाही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात नोकरी करण्याची मानसिकता नसल्याने प्राचार्य, प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असून यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. भावी पिढ्या घडविण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती, गंभीर बनलेला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती ,अशा समस्यांचे निराकरण होण्याकरिता अधिवेशनात विचार मंथन होईल .असा आशावाद शेवटी नामदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
आ. प्रताप अडसड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहण्यासाठी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी याकरिता आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
कार्यवाह डॉ. मारोती तेगमपुरे यांनी परिषदेची स्थापना, वाटचाल, राबविलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. डॉ. अविनाश निक्कम, डॉ. राहुल म्होपरे यांची समायोचित भाषणे झाली. अर्थदीप स्मरणिकेसह विविध ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब वाघ यांनी केले तर डॉ. एम.जी.हिंगे यांनी आभार मानले. यावेळी माजी अध्यक्षांसह राज्यभरातील अर्थतज्ञ, अभ्यासक, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. अधिवेशन यशस्वीतेसाठी डॉ. सुशील सूर्यवंशी, डॉ.वसंत उगले, डॉ. शिवानंद मुंढे, डॉ. विलास जाधव, डॉ.सुनील मिरगणे, डॉ. खांडेभराड, डॉ. लहाने यांच्यासह विश्वस्त व कार्यकारणी सदस्य परिश्रम घेत आहेत.