जालना । जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सीमध्ये परवानाधारक, परवान्याचा व वाहन चालकाचा तपशिल प्रवाशांना सहज दिसेल अशा पध्दतीने दर्शनिय भागावर प्रदर्शित करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
मिटर टॅक्सी (काळी-पिवळी व कुल कॅब) व ऑटोरिक्षा या वाहनांमध्ये परवानाधारकाचा तपशिल, परवान्याचा तपशिल, वाहनाचा व वाहन चालकाचा तपशिल तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक व संबंधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक दर्शविणारे स्टिकर प्रवाशांना सहज दिसतील अशा पध्दतीने प्रदर्शित करावे.
मिटर टॅक्सी (काळी-पिवळी व कुल कॅब) व ऑटोरिक्षा या वाहनांमध्ये परवानाधारकाचा तपशिल, परवान्याचा तपशिल, वाहनाचा व वाहन चालकाचा तपशिल प्रदर्शित न केल्यास किंवा उल्लंघन झाल्यास अशा गुन्ह्यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988च्या कलम 86 अंतर्गत पहिल्या गुन्हासाठी पाच दिवसांकरिता परवाना निलंबित किंवा 1 हजार रुपये दंड, दुसरा गुन्हा घडल्यास परवाना दहा दिवसांकरिता निलंबित करणे किंवा निलंबनाऐवजी 3 हजार रुपये तडजोड शुल्क तसेच तिसरा गुन्हा घडल्यास परवाना पंधरा दिवसांकरिता निलंबित करणे किंवा निलंबनाऐवजी 5 हजार रुपये तडजोड शुल्क याप्रमाणे विभागीय कार्यवाही करण्यात येईल.
परिवहन आयुक्त कार्यालयाने विहीत केलेल्या मराठी भाषा नमुन्यातील कमीत कमी 2 वर्षे टिकेल अशा दर्जाचे स्टिकर परवानाधारकाने स्वतः तयार करून प्रवाशांना सहज दिसता येतील त्या ठिकाणी लावावे. स्टिकर प्रवाशांना सहजासहजी काढता येतील अशा प्रकारचे नसावेत याची दक्षता घ्यावी. स्टिकरवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शिक्का तसेच स्वाक्षरी असल्याशिवाय ते वाहनास चिकटवू नये. स्टिकरचा आकार 28 सेंटीमीटर X 10 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने विहीत केलेल्या नमुन्यात परवान्याचा व वाहन चालकांचा तपशिल रिक्षा चालकाने अथवा परवानाधारकाने सादर केल्यास तो कार्यालयात स्विकारावा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चालक-मालकाने सादर केल्यास तो कार्यालयात स्विकारावा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चालक-मालकाने सादर केलेल्या प्रत्येक स्टिकरला एक अनुक्रमांक द्यावा. कोणत्या वाहनाला कोणत्या अनुक्रमांकाचे स्टिकर लावले याचा अभिलेख जतन करावा. तसेच असे स्टिकर विशिष्ट व्यक्ती किंवा कंपनीचे असावे असे बंधनकारक राहणार नाही. तरी संबंधित ऑटोरिक्षा व टॅक्सीचालक आणि परवानाधारकांनी याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
ऑटोरिक्षा, टॅक्सीमध्ये परवान्याचा आणि वाहन चालकाचा तपशिल दर्शनिय भागावर प्रदर्शित करावा
जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन