जालना । सत्तेचे लोणी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्याचे काम आ. कैलास गोरंटयाल यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यामुळे आज या ठिकाणी कार्यकर्त्यांची असलेली लक्षणीय उपस्थिती हे त्यांच्या चांगल्या कामाचे द्योतक असल्याचे उद्गार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आज येथे बोलतांना काढले. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातून ज्या पध्दतीने मोठे उद्योग अन्य राज्यात पळविले जात आहे त्याचा लाभ भविष्यात महाविकास आघाडीला होईल असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना व्यक्त केले.
जालना शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी शहरातील गुरू गणेश भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा प्रभारी माजी आ. नारायणराव पवार, आ. कैलास गोरंटयाल, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, संतोष सांबरे, काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, युवा नेते अक्षय गोरंटयाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, काँग्रेसचे नेते नवाब डांगे, जालना मर्चंट बँकेचे चेअरमन अंकुशराव राऊत, रिपाई नेते ब्रम्हानंद चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, गणेशलाल चौधरी, माजी गटनेते गणेश राऊत, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतिष पंच, विनायक महाराज फुलंब्रीकर, सौ. सुषमाताई पायगव्हाणे, शीतलताई तनपुरे, दीपक भुरेवाल, भंते शिवली, भास्कर मगरे, प्रभाकर पवार, बाळासाहेब तनपुरे, बाला परदेशी, सुरेश खंडाळे अण्णासाहेब खंदारे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणात अंबेकर पुढे म्हणाले की, आपल्या देशात प्रत्येक सन काही ना काही संदेश देण्याचे काम करतात. दही हंडीचे उदाहरण देताना कार्यकर्त्यांच्या थरावर दहीहंडी फोडण्याचे काम आ. गोरंटयाल यांनी केले असले तरी सत्तेचे लोणी मात्र कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. पंती ही घरात प्रकाश पाडण्याचे काम करत असते. कार्यकर्तारुपी पंतीला तेल देण्याचे काम आ. कैलास गोरंटयाल यांनी केल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची अलोट गर्दी जमली आहे. आ. गोरंट्याल हे नेहमीच रोखठोक भुमिका घेवून काम करत असतात. त्यामुळे जे काही बोलायचे ते अगदी तोंडावर बोलुन मोकळे होतात. मनात कोणतेही पाप ठेवत नाही अशी ही दिलदार व्यक्ती असल्याचे सांगुन जालना शहर व जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गोरंट्याल परिवाराने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केल्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी शहरासह जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात यश मिळवले असल्याचे अंबेकर म्हणाले.
यावेळी बोलतांना आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, सत्तेचा दुरूपयोग करून महाराष्ट्र राज्यातून अनेक महत्वाचे प्रकल्प पळवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत असून बेरोजगारांना देशोधडीला लावण्याचे काम राज्यातील सरकारने चालवले असल्याचा आरोप आ. कैलास गोरंट्याल यांनी केला. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षा म्हणून काम करत असतांना सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्या बरोबरच स्वच्छता आणि रस्ते निर्मितीला प्राधान्य देवून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे. त्यामुळे पाच वर्षापुर्वी शहराची असलेली परिस्थिती आणि आज असलेली परिस्थिती यात निश्चितपणे बदल झाल्याचे चित्र दिसत असून शहरातील नागरीक देखील विकास कामांमुळे समाधानी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जालन्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या कॉलेजच्या उभारणीसाठी लवकरच 400 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगुन सत्ता कोणाचीही असली तरी जालन्यातील मेडिकल कॉलेज सुरू करणारच अशी ठाम ग्वाही देवून आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी दिली. तसेच शहराच्या सर्वांगीन विकास कामात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा देखील मोलाचा वाटा राहिला असल्याचे आ. गोरंट्याल यांनी आपल्या भाषणातून नमूद केले आहे. माजी नगराध्यक्ष अंबेकर हे अत्यंत बुध्दीवान व्यक्त असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यास भविष्यात त्यांना चांगली संधी कशी मिळेल यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही देतांनाच दहिहंडीमध्ये जो वरती असतो त्याला धाडस दाखवावे लागते. अंबेकर यांना देखील तशी संधी चालून आली होती. मात्र, अंबेकरांनी निष्ठेला महत्व देत सदर संधी धुडकावून लावल्याचे आ. गोरंट्याल शेवटी म्हणाले. तत्पुर्वी नामदेवराव पवार, माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, एकबाल पाशा, माजी आ. संतोष सांबरे, कॉ. सगीर अहेमद, विनायक महाराज फुलंब्रीकर, ॲड. ब्रम्हानंद चव्हाण आदींनी आपल्या भाषणातून उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचलन शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी तर शेवटी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव यांनी आभार मानले.