आदर्श व्यापारी पुरस्काराने अतुल लढ्ढा सन्मानित

32

जालना । कृषी निविष्ठा संघटनेचे अध्यक्ष, अतुल ब्रिजमोहन लढ्ढा यांना व्यापार आणि सामाजिक कार्याबद्दल आदर्श व्यापारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

व्यापारी महासंघ, जनरल मर्चंट कॅट व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ( ता. 30) झालेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते अतुल लढ्ढा यांचा सहकुटुंब पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. साडेतीन दशकांपासून खते,बियाणे, शेती उपयोगी साहित्य, विक्री व्यवसायात कार्यरत असलेल्या अतुल लढ्ढा यांनी जालना जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब व मोसंबी फळबाग लागवड, वाढ, मोसंबीस भौगोलिक (जी. आय.) मानांकन मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. मागील अकरा वर्षांपासून माकसुवा संघटना अध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या अतुल लढ्ढा यांनी कृषी साहित्य विक्रेत्यांच्या अडी- अडचणी सोडवल्या, बांबू लागवड वाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मागील 22 वर्षांपासून लायन्स क्लब या अंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेत विविध पदे भूषवतांना मोठ्या प्रमाणात सेवा कार्य केले. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व तंत्रशास्त्र उपलब्ध करून देण्यात ख्याती असलेल्या अतुल लढ्ढा यांनी द्राक्षे व डाळिंब एकञ लागवड करून बागायतदार शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या कार्याची दखल घेत आदर्श व्यापारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुटुंबातील सदस्य सौ. जयश्री लढ्ढा, प्रतिक लढ्ढा, सौ. कृष्णा लढ्ढा यांच्या समवेत त्यांनी पुरस्कार स्विकारला. दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून श्री. लढ्ढा यांचे अभिनंदन होत आहे.