जालना – जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य राहणार आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्राशिवाय या पुराव्यांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉबकार्ड आणि फोटोसह पेंशन दस्तऐवज हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पांचाळ यांनी कळविले आहे.