जालना । पतीने पत्नीवर संशय घेत धारदार कुर्हाडीचे घाव करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी(दि. ३०) रोजी परतूर येथे उघडकीस आली आहे. खून करून आरोपी पती स्वतः कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
परतूर शहरातील सावतानगर भागातील शेख मुसा यांच्या मालकीच्या खोलीमध्ये मिलिंद नारायण पाडेवार (२५) हा इसम पत्नीसह किरायाने दोन महिन्यापासून वास्तव्यास आहे. मिलिंद पाडेवार हा त्याची पत्नी प्रतीक्षा (२२) हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. रविवारी दुपारी प्रतिक्षा ही फोनवर बोलत होती, तेवढ्यात मिलींद पाडेवार याने कोणताही विचार न करता प्रतिक्षा हिच्यावर डोक्यावर कुर्हाडीने सात ते आठ वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रतिक्षा ही जागीच मरण पावली. त्यानंतर मिलिंद पाडेवार हा रक्ताने माखलेल्या कुर्हाडीसह स्वतः थेट परतूर पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परतुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. परतूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.