घनश्याम गोयल उमेदवारी अर्ज दाखल करणार?

32

जालना । प्रतिनिधी – येथील प्रसिद्ध उद्योजक तथा गौरक्षक, हिंदुत्ववादी घनश्याम गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून मंगळवार (दि 29) रोजी ते उमेवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. अपक्ष म्हणून ते उमेवारी दाखल करू शकतात. किंवा हिंदुत्ववादी चेहरा असल्याने भारतीय जनता पक्षाकडुन त्यांना उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीची अनेक ठिकाणी मैत्रीपुर्ण लढती होण्याच्या शक्यता आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राज्यभरातील अनेक ठिकाणी बंडखोरी करत नामनिर्देशन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे येत्या 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशीपर्यंत कोण-कोणते बंड शमविण्यास महायुती तसेच महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते यशस्वी होतात ते कळेलच.
सोमवार (दि 28) रोजी घनश्याम गोयल यांनी नामनिर्देशन अर्जाची खरेदी केली असून मंगळवार (दि 29) रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. स्टील उद्योजक असलेले गोयल यांचा उद्योगनगरी म्हणून जालन्याला बहुमान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे. उद्योजक म्हणून यशस्वी वाटचाल गोयल यांची सुरु आहे. हिंदुत्ववादी, गौरक्षक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. शिवसेनेशी जवळीकता आहे. तर हिंदु महासभा ही भारतातील मोठे हिंदुत्तवादी राजकीय संघटन आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील घनश्याम गोयल यांना त्यांच्या मित्रपरिवाराकडुन लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी गळ घालण्यात आली होती. मात्र, त्यावेळी गोयल यांनी त्यावेळी निवडणुक लढविली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत मित्र परिवारांकडून त्यांना लढण्यासाठी बळ देण्यात येत आहे.

घनश्याम गोयल यांनी नामनिर्देशन अर्जाची खरेदी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवार (दि 29) शेवटची तारीख आहे. त्यामुळे घनश्याम गोयल हे उमेदवारी अर्ज दाखल करतात की नाही हे दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट होईल.