जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील रहिवासी पवन सतीश कोळी याने बीड येथील चंपावती क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागीय लॉन टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले असून, नोव्हेंबर महिन्यात बारामती येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. ही जालन्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
विभागीय स्पर्धेत प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पवन कोळी याने अंतिम फेरी गाठली आणि उपविजेतेपद पटकावले. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पवनने गतवर्षीही राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून राष्ट्रीयस्तरावर राज्याचे नेतृत्व केले होते. राष्ट्रीय स्पर्धेत तो पाचव्या क्रमांकावर राहिला होता. नोव्हेंबर महिन्यात बारामती येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आपले पुरेपूर प्रयत्न राहतील, असा मनोदय पवनने व्यक्त केला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या.