जालना | प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनच्यावतीने दिवाळीनिमित्त जालना शहरातील सहकार बँक कॉलनीतील भारत माता मागासवर्गीय अपंग निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त कपडे वाटप करण्यात येऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
दिव्यांग हे देखील समाजाचा एक घटक आहेत. दिवाळीनिमित्त त्यांचाही आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे आयुष बन्सल व परिवाराच्या सहकार्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष सागर दक्षिणी, सचिव गौरव मोदी, आयुष बंसल, प्रतीक नानावटी आणि शाळेच्या शिक्षकांची उपस्थिती होती.
क्लबच्यावतीने गेल्या 20 वर्षापासून नवरात्रोत्सवात डिव्हाईन दांडियाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दांडियाचे आयोजन न करता, विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. नवरात्रोत्सवात मोफत मधुमेह निदान शिबिर, रक्तदान शिबिर, पानेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयात शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर लोकार्पण आणि दिवाळीनिमित्त दिव्यांगाना कपडे वाटप असे उपक्रम राबवण्यात आले. लवकरच चॅरिटीशोचे आयोजन करून त्या माध्यमातून स्व. राजीव गांधी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पलंग (बंक बेड) प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष सागर दक्षिणी यांनी दिली.