जालना । प्रतिनिधी – जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, मोठ्या प्रमाणात बोकाळलेली बेरोजगारी, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण यामुळे राज्यातील महायुती सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्याच्या सत्ताकारणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे जालना लोकसभा प्रभारी माजी मंत्री डॉ. पी. सी. शर्मा यांनी रविवार (दि 27) रोजी येथे बोलतांना केले.
जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांच्या निवडणुक प्रचाराचे नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज रविवारी दुपारी आयोजीत करण्यात आली होते. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. कल्याण काळे, जालना विधानसभेचे उमेदवार आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव अंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, युवानेते अक्षय गोरंट्याल, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जांगडे, कल्याणराव दळे, प्रमोद रत्नपारखे, विनयकुमार कोठारी, संजोग हिवाळे, बदर चाऊस, बाला परदेशी, माजी गटनेते गणेश राऊत, अब्दुल रऊफ परसुवाले, अब्दुल रफिक, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, दुर्गेश काठोठीवाले, मनकर्णाताई डांगे, बाबुराव पवार, राम सावंत, दिपक भुरेवाल, दिनकर घेवंदे, किशोर मघाडे, अमेर पाशा, किशोर मगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना डॉ. शर्मा म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मुळ पक्षांसह त्यांची चिन्ह बंडखोरांनी पळवून नेल्यानंतर देखील लोकसभा निवडणुकीत नविन चिन्ह असतांना या पक्षांना मिळालेले यश सर्व सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी अधोरेखीत करणारी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील इंडिया आघाडी राज्यात सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त करून राज्यातील महायुती सरकारचे पाय खोलात गेल्यामुळे जाता-जाता त्यांनी लाडकी बहिन योजनेचा डाव टाकून कसाबसा बचाव करण्याचा प्रयत्न केला असला तरी राज्यातील जनता किती जागृत आहे हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले असून या निवडणुकीत देखील तिच परिस्थिती कायम राहील असा ठाम विश्वास डॉ. पी. सी. शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पुव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बाबुराव पवार, संजोग हिवाळे यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. संचलन राम सावंत यांनी तर शेवटी गणेश राऊत यांनी आभार मानले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात परिवर्तन करण्यासाठी गोरंट्याल यांना विजयी करा ः खा. कल्याण काळे
राज्यातील सत्तेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण असून त्यासाठी जालन्यातून इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन खा. डॉ. कल्याण काळे यांनी येथे बोलतांना केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, जालना शहर व जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवून घेण्यासाठी राज्यात आपल्या विचाराचे सरकार असणे गरजेचे आहे. गोरंट्याल हे रोखठोक बोलणारे असून एखांदे काम होत असेल तर ते हो म्हणतात. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा लोकांना भावतो. जालन्यासह जिल्ह्यातील पाचही जागेवर इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होईल अशी सकारात्मक वातावरण असून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येणारे पंधरा दिवस चांगले कष्ट आणि प्रयत्न करून गोरंटयाल यांच्यासह मविआच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन शेवटी डॉ. काळे यांनी केले.
विचारांच्या मागे निष्ठेने उभे रहा ः भास्करराव अंबेकर
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत सुसंस्कृत राजकारण केले आहे. त्यांच्या विचारांच्या पाठिमागे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निष्ठेने उभे रहावे असे आवाहन शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले. राज्यातील सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अंबेकर यांनी आपल्या भाषणातून जोरदार टिका केली. अत्यंत खालच्या स्तरावर जावून राजकारण करण्याला प्राधान्य दिले जात असल्याबद्दल शोकांतीका व्यक्त करून एकीकडे लाडकी बहिनीसारखी योजना राबवायची आणि दुसरीकडे बालिकांसह महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार वाढत असून ही परिस्थिती बदलण्यासाठी जालन्यातून आ. कैलास गोरंट्याल यांना विजयी करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. सोयाबिन, कापसाचे भाव कोसळल्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी राज्यात परिवर्तन आवश्यक असल्याचे सांगून अंबेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या घोषणेची आपल्या भाषणातून चांगलीच खिल्ली उडवली. कोणतेही काम टक्केवारी शिवाय होत नाही अशी परिस्थिती जवळपास सर्वच ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांना विजयी करण्याचे आवाहन अंबेकर यांनी केले.
गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील – आ. कैलास गोरंटयाल
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणार्यांना या निवडणुकीत शिवसैनिक निश्चितपणे धडा शिकवतील असा विश्वास इंडिया महाविकास आघाडीचे जालना विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार कैलास गोरंटयाल यांनी येथे बोलतांना व्यक्त केला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडे आपल्यासह अनेकांनी तिकीट मागितले होते. मात्र, तिकीट आपल्याला मिळाले. उमेदवारी मागणे हा प्रत्येकाचा अधिकार असून त्यांच्याशी आपले कोणतेही वैर नाही. विधानसभेची निवडणूक भयमुक्त वातावरणात झाली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आतापासूनच दादागिरी, गुंडगिरीचे प्रकार सुरू झाले असून त्यांची शिकवण तशी आहे. त्यामुळेच त्यांनी गद्दारी केल्याचा टोला आ. कैलास गोरंटयाल यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला लगावला आहे. जालन्यासह जिल्ह्यातील मविआ उमेदवार निवडून आणायची जबाबदारी आपल्या सर्वांची असून आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आघाडीचा धर्म पाळावा अशी अपेक्षा शेवटी गोरंटयाल यांनी व्यक्त केली.