विकासाच्या मुद्द्यावरचं निवडणुक लढवणार – आ.कैलास गोरंटयाल ; शहराला दररोज पाणी पुरवठा आणि विद्यापीठासाठी प्रयत्न करणार

25
जालना | प्रतिनीधी – विकासाच्या मुद्द्यावरचं आपण विधानसभेची निवडणूक लढणार असून शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्याबरोबरच जालन्यात एखादे विद्यापीठ मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही जालना विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी आज शनिवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
जालना विधानसभा मतदार संघातून आज शनिवारी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आपल्या प्रितीसुधा नगर येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याला सहाव्यांदा जालना विधानसभेची उमेदवारी दिल्याबद्दल गोरंटयाल यांनी सर्वप्रथम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाचे ज्येष्ठ नेते वेणुगोपाल, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदींचे आभार व्यक्त करून आपण केलेल्या कामाची ही पावती असल्याचे सांगितले. मागील काळात आपण जालना शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ते सुरू होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आणि प्रयत्नांना मोठे यश मिळाले. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जातांना विकासाचे मुद्दे हाच आपला अजिंठा राहणार आहे. शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असून जायकवाडी प्रकल्पाद्वारे सध्या शहराला १५ एमएलडी इतका पाणी पुरवठा होत असून अंबड शहराजवळ असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात सुरू असलेले काम पूर्ण झाल्यानंतर आणखी ३५ एमएलडी असे एकूण ५० एमएलडी पाणी शहराला मिळणार असून घानेवाडी ते शहरातील जलशुद्धीकरण केंद्र असे नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर संत गाडगेबाबा जलाशयातून देखील पाणी पुरवठा शहराला होणार आहे. याशिवाय हातवन येथूनही शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे प्रयत्न यशस्वी झाले तर मुंबई, पुणे, नागपूर नंतर दररोज पाणी पुरवठा करणारे जालना शहर हे राज्यातील चौथे शहर होईल असा विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला. कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी हा प्रवेश घेतल्यापासून परिक्षेपर्यंत अभ्यास करतो. आणि काही विद्यार्थी हे नकला मारून पास होतात. मात्र, मुलाखतीसाठी गेल्यानंतर ज्याने परिक्षेपर्यंत अभ्यास तोच पास होतो. नक्कल करणारा विद्यार्थी पास होत नाही असा टोला आ. कैलास गोरंटयाल यांनी नावं न घेता आपले प्रतिस्पर्धी उमेदवार अर्जुनराव खोतकर यांना लगावला.