जालना | प्रतिनीधी – राज्यातील अनेक मोठे उद्योग गुजरात मध्ये पळविण्यात भाजपा महायुती सरकारने महत्वाची भूमिका बजावली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे मुश्कील झाले असून ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल असा विश्वास अ.भा.कॉ. कमिटीचे सचिव तथा जालना लोकसभा प्रभारी डॉ.पी.सी. शर्मा यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केला.
शहरातील एका हॉटेल मध्ये आज बुधवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. कल्याण काळे, आ.कैलास गोरंटयाल, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना शर्मा म्हणाले की, मध्यप्रदेश राज्यात कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी वापरलेला फार्मुला भाजपाने महाराष्ट्रातही वापरला. शिवसेनेच्या आमदारांना पैसे आणि इतर आमिष दाखवून भाजपाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि सत्ता काबीज केली. ही वस्तुस्थिती राज्यातील सर्व जनतेने त्यांच्या डोळ्यांनी बघितली होती. एव्हढेच नाही तर राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपा आणि महायुती सरकारच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरात राज्यात पळवून नेले. सदर उद्योग गुजरात मध्ये पळविण्यात राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारचाच हात असल्याचा आरोप डॉ.शर्मा यांनी यावेळी केला. उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष चिन्हासह पळविण्यात आले. मात्र, नवीन चिन्ह असतांनाही कोणत्याही भूलथापांना बळी न पडता ठाकरे आणि पवार यांना महाराष्ट्रातील जागरूक जनतेने खंबीर साथ देत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले आणि भाजपा महायुतीला त्यांची जागा दाखवून दिली. या महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभे प्रमाणेच महाविकास आघाडीला यश मिळेल असा विश्वास डॉ. शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, तत्पूर्वी डॉ. पी.सी.शर्मा यांच्या हस्ते महायुती सरकारच्या भ्रष्ट कारकीर्दीचा पर्दाफाश करणाऱ्या ” गद्दारांचा पंचनामा ” या पत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी राम सावंत, महावीर ढक्का, अतिकखान, राजेंद्र गोरे, विनोद यादव, अशोक उबाळे, शिवप्रकाश चितळकर, अण्णासाहेब खंदारे, राजेश पवार आदींची उपस्थिती होती.
घोटाळेबाज सरकारने अदानी, अंबानी यांची घर भरली – खा.काळे
राज्य आणि केंद्रातील सरकारने कोटयावधी रुपयांचे घोटाळे करत अदानी, अंबानी या उद्योगपतींची घर भरली असल्याचा आरोप खा. डॉ. कल्याण काळे यांनी यावेळी केला. मागील दहा वर्षात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, वीज नाही, घेतलेले कर्ज फेडण्यास येत असलेल्या अपयशामुळे राज्यात विशेषतः मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अर्थखात्याचा कोणताही अभिप्राय नसतांना राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जवळपास दिडशे पेक्षा अधिक शासन निर्णय काढले असा आरोप देखील खा. डॉ. कल्याण काळे यांनी यावेळी बोलतांना केला.
लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची साथ मविआलाच मिळणार – आ. गोरंटयाल
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेल्या बहिणींची साथ महाविकास आघाडीलाच मिळणार असल्याचा दावा आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीत मोठया प्रमाणावर फटका बसल्याने राज्यातील महायुती सरकारने सत्तेत पुन्हा येण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. त्याचा लाभ मिळत असला तरी तेल, साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून लाडक्या बहिणींची झोप उडवून टाकली आहे. त्यामुळे सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींची साथ आम्हालाच मिळणार असल्याचा दावा गोरंटयाल यांनी केला. जालना शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. हातवन प्रकल्पातून शहराला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न असून घानेवाडी ते जालना या जलवाहिनीची गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय जायकवाडी योजनेद्वारे अधिक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील कामाला देखील सुरू करण्यात आले आहे त्यामुळे येत्या काळात शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी दिली.
मोदी – शहांच्या दबावामुळे उद्योग गुजरात मध्ये पळवले – देशमुख
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावतंत्रामुळेच महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरात राज्यात पळवून नेल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला. सदर उद्योग पळवल्याने राज्यातील लाखो तरुण रोजगारापासून वंचित राहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार, महापुरुषांचा अवमान, लेकी बाळींवर होत असलेले अत्याचार शेतमालाला हमी भाव आणि पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था खुप वाईट झाली असून पेट्रोल, डिझेलसह तेल, तिखट, मीठ आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारच्या काळात झाले असून यामुळे त्रस्त झालेली जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास देशमुख यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.