परतूर । प्रतिनिधी – परतूर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला सातव्यांदा दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आभार व्यक्त केले. आमदार बबनराव लोणीकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की परतूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अविरत संघर्ष केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी आणून परतूर विधानसभा मतदारसंघात मराठवाडा वाटर ग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविली असून परतूर शहरात उड्डाणपूल मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह क्रीडा संकुल नाट्यगृह कोर्ट इमारत तर मंठा शहरात मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह कोर्ट इमारत क्रीडा संकुल या सह मतदार संघातील गावागावात विजेचे आणि रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. विधानसभा मतदारसंघातील गावागावात प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेली विकास कामे पाहता परतुर विधानसभा मतदारसंघ राज्यात एक नंबरला आहे. परतूर विधानसभा मतदारसंघात झालेली विकास काम आणि भविष्यात होणार असलेली विकास कामे याच गोष्टीचा व्हिजन घेऊन आपण सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणार असून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मला 30000 मतांच्या फरकाने येथील मतदारांनी निवडून दिले होते यावेळी हा आकडा 40 हजारांवर पोहचले असा विश्वासही लोणीकर यांनी व्यक्त केला.