सामाजिक कार्यकर्ते पाडेवार यांनी ज्येष्ठांना मिळवून दिला पगार

4

परतूर । प्रतिनिधी – येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे शहरातील जवळपास 350 वयोवृद्ध नागरिकांना हक्काचा पगार सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर ऐन दिवाळीत हास्य फुलले आहे.
शहरातील अनेक जेष्ठ नागरिक अद्यापही शासनाच्या हक्काच्या पगारापासून वंचित होते.या सर्वांच्या फायली पाडेवार यांनी तहसील कार्यालयात मंजुरीसाठी दाखल केल्या होत्या.यामध्ये पुरुषांसह अनेक महिलांचा समावेश होता. पगारापासून वंचित असलेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांची भेट घेऊन पगार सुरु होण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत पाडेवार यांनी तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांची भेट घेऊन पगाराचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी उपोषणास बसण्याचा इशाराही दिला होता तसेच सर्व जेष्ठ नागरिक हे गरजू असल्याची बाब संबंधित अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली. अधिकार्‍यांनी देखील पाडेवार यांच्या मनात असलेली वृद्धाबद्दल तळमळ लक्षात घेत ताबडतोब सर्व फायली मंजूर केल्या.लवकरच या सर्व वृद्ध मंडळींच्या खात्यात निराधाराचे अनुदान पडणार आहे,त्यामुळे वृद्धांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे.
अनेक जेष्ठ नागरिक वृद्धपणी आजारी पडतात. अशावेळी त्यांना वेळीच औषधोपचार किंवा योग्य ती मदत मिळणे आवश्यक असते.माणुसकीच्या भावनेतून वृद्धाना पगार सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला.लाडकी बहीण योजनेचा देखील हजारो महिलांना लाभ मिळवून दिला आहे.केलेल्या कामाचे आत्मिक समाधान लाभते असल्याची प्रतिक्रिया अर्जुन पाडेवार यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केलेल्या भरीव सहकार्यामुळेच आम्हाला पगार सुरु झाला आहे. पाडेवार यांनी सर्व कागदपत्रे तयार केली. आम्हाला कागदपत्रे झेरॉक्स करण्याचा खर्चही करू दिला नाही. पाडेवार यांचे वेळोवेळी सहकार्य लाभते असल्याचे लाभार्थी उत्तम घुगे यांनी म्हटले आहे.