घनसावंगी । प्रतिनिधी – समृद्धी साखर कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांना गळीत हंगाम 2023-24 मधील गाळप झालेल्या उसाचा पहिला 2800 रुपये प्रती मे. टन प्रमाणे देण्यात आला. आता दिवाळी सणानिमित्त कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी 100 रुपये प्रती मे टन प्रमाणे वाढीव हप्ता देण्याची घोषणा केली आहे.हा वाढीव हप्ता दोन ते तीन दिवसात शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी मंगळवारी (दि.17) दिली आहे.
शेतकर्यांच्या उसाला समृद्धी कारखाना उच्चांकी भाव देत असल्याने शेतकरी आनंदी आहेत. उच्चांकी भावाची परंपरा यंदाही ’समृद्धी’ने कायम ठेवली असून पहिला हप्ता 2 हजार 800 रुपये प्रतीटन प्रमाणे दिल्यानंतर दिवाळी सणासाठी 100 रुपयाचा वाढीव हप्ता देण्याचा निर्णय सतीश घाटगे यांनी जाहीर केला आहे.
कपाशी, सोयाबीन या पिकाचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले असून हातात पैसा आला नाही. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकर्यांना आधार देण्यासाठी समृद्धीने 100 रुपयाचा वाढीव हप्ता देण्याचा निर्णय घेतला. लवकरच शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल अशी माहिती समृद्धीचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली.