1755 केंद्रावरुन 16 लाख 23 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

19

जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदन या पाच विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 1755 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून या निवडणुकीत 16 लाख 23 हजार 943 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बुधवार (दि 16) रोजी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, रिता मेत्रेवार, निवडणुक उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार (दि 15) रोजी जाहीर केला. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, याची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यात जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 1755 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यात परतूर 359, घनसावंगी 354, जालना 335, बदनापूर 373, तर भोकरदन विधानसभा मतदार संघात 334 मतदान केंद्रांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात 18 ते 19 वयोगटातील 33047 नवमतदार आहे. यात पुरुष 20809 तर स्त्री 12236 तसेच तृतीयपंथी 2 मतदारांचा समावेश आहे. एकुण मतदारांत पुरुष 8,47,777, महिला मतदार 7,76,126 तर तृतीयपंथी 40 मतदार आहेत.
विधानसभा मतदार संघात आचारसंहिता व खर्च नियंत्रणासाठी फ्लाईंग स्कॉडची 22 पथके, स्टॅटिस्टीक सर्वेलन्स टीमची 22 पथके, व्हिडीओ सर्वेलन्स टीमची 26 पथके, व व्हीव्हीटीच्या सहा पथके कार्यरत राहणार आहेत. निवडणुक प्रक्रियेतील प्रत्येक बारीक हालचालींवर या पथकांची नजर राहणार आहे. या व्यतिरिक्त पैसे, मद्य व ईतर अमली पदार्थांच्या वाहतुकीवर पोलीस यंत्रणेसह निवडणुक विभागाचे अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.
उमेदवारी लढविणार्‍या उमेदवारास मा. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार 40 लक्ष ही खर्चाची मर्यादा निश्‍चित केलेली आहे.
सी व्हीजील अ‍ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी केले आहे. या अ‍ॅपद्वारे निवडणूक संदर्भातील आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ या अ‍ॅपवर पाठवून त्याची तक्रार नोंदविण्यात येते. अशा तक्रारींवर फ्लाईंग स्कॉड च्या माध्यमातून त्वरीत म्हणजेच 100 मिनीटाच्या आत तक्रार निकाली काढण्यात येणार असल्याचेही डॉ. पांचाळ यांनी स्पष्ट केले. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर तसेच अ‍ॅपल प्ले स्टेअरवर उपलब्ध आहे.
सदर मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार रॅम्प, पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, इत्यांदीचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना हे याबाबतचे नोडल अधिकारी आहेत.3 पेक्षा जास्त मतदान केंद्रावर प्रवेश, निर्गम, वाहतुक, पार्कींग संदर्भात पोलीस अधिक्षक, जालना यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदारांना त्यांचे ओळख पत्र (एझखउ) किंवा खालील पैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे.1)आधार कार्ड 2)मनरेगा कार्ड 3)फोटो असलेले बँक/पोस्ट पासबुक 4)श्रम मंत्रालयाद्वारे वितरीत केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड 5)वाहन परवाना 6)पॅन कार्ड 7) छझठ द्वारे वितरित केलेले स्मार्ट कार्ड 8)पासपोर्ट 9)फोटो असलेले पेंशन विषयक कागदपत्रे 10)शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या कर्मचा-यांचे ओळखपत्र 11)खासदार/आमदार यांना वितरीत केलेले सरकारी ओळखपत्र 12)सामाजिक न्याय विभाग तर्फे वितरित केलेले दिव्यांगाचे स्मार्ट कार्ड(णऊखऊ).
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण मतदार संघाच्या 50 टक्के इतक्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे, सदर वेबकास्टिंगचे नियंत्रण भारत निवडणूक आयोग /मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी / सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया,नामनिर्देशन पत्रांची छाननी, चिन्ह वाटप,एफएलसी, ईव्हीएमची वाहतूक, प्रचार सभा, टपाली मतदान प्रक्रिया, मत मोजणी प्रक्रिया, तसेच एसएसटी पथकांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.