ध्वनीक्षेपकासह खाजगी तसेच सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

7

जालना । प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे सदर बाबींवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत, निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणार्‍या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे आदी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाच्या परवानगी शिवाय व संबंधित परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये खाजगी व सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणार्‍या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणार्‍या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. ध्वनीवर्धकांचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसविलेले असोत, त्यांचा सकाळी 6 पुर्वी किंवा रात्री 10 वाजेनंतर आणि संबंधित अधिकार्‍यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय करण्यात येऊ नये. संबंधित प्राधिकार्‍यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनीवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.