जालना । प्रतिनिधी – शहरातील प्रभाग क्र. 27,28,29 व 30 मधील मंमादेवी नगर, आंबेडकर नगर, लहुजी नगर, नुतन वसाहत, राहुल नगर, विद्युत कॉलनी, आनंद नगर, जयनगर, जमुनानगर, बँक कॉलनी, समर्थनगर, प्रयाग नगर, शिवनगर, कांचन नगर भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करणार्या नुतन वसाहत येथील पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह गेल्या सहा दिवसापासून पाण्याच्या टाकीत असल्याचे समजते व तेच पाणी वरील भागातील नागरिकांना पुरविण्यात आले. सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. त्या निमित्ताने अनेक जण उपवास ठेवतात. प्रामुख्याने महिला मोठ्या प्रमाणावर उपवास धरतात. असे असतांना हे अशुद्ध पाणी या भागातील नागरिकांना पुरविण्यात आले. हे पाणी नागरिकांच्या पिण्यात आल्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेस जालना शहर महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड व पाणी पुरवठा अधिकारी केशव कानपुडे व पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी यांच्यावर नागरिकांच्या जीवीतास हानी पोहचविल्या प्रकरणी तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेस ज्या भागात हा अशुद्ध पाणी पुरवठा झाला आहे. त्या भागातील नागरिकांची घरोघरी जावून मोफत आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास येत्या 21 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्याचा ईशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर वंजारी महासंघ जालना जिल्हाध्यक्ष उमेश कुटे यांची स्वाक्षरी आहे.