जालना । परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून वार्षिक सरासरी च्या तीनशे पट अधिक पावसाची नोंद झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तेल वर्गीय पिके, फळबागा शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने हवालदिल झालेल्या बळीराजास वाचविण्यासाठी पंचनाम्यात वेळ न दवडता प्रोत्साहन अनुदानासारखे दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट मदत जमा करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या कडे केली आहे.
जालना जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त भागांचा शुक्रवारी ( ता. 21) कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. पानशेंद्रा,जामवाडी,लालवाडी ,आंबडगाव ता. बदनापुर येथे बांधावर जाऊन कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर,सह संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, फेरोजलाला तांबोळी,बाबासाहेब इंगळे,युवा सेनेचे नेते अभिमन्यु खोतकर उपस्थित होते. भाऊसाहेब घुगे यांनी विदारक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या व्यथा ना. अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने मदत देण्याची आग्रही मागणी केली.
महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार 33% च्या वर नुकसानीचे पंचनामे करावेत अशी अट घातली. असे सांगून भाऊसाहेब घुगे म्हणाले, जालना जिल्ह्यात सरासरी च्या तीनशे पट अधिक पाऊस झाला असल्याने सर्वञ शेतांना तळ्यांचे स्वरूप आले. सोयाबीनची माती तर कापसाच्या वाती झाल्या, खरिप हंगाम हातचा गेला असून दिवाळी सण साजरा कसा करावा हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. आत्महत्येच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी दोन दिवसात कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार तर फळबागायतदारांना हेक्टरी एक लाख रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी भाऊसाहेब घुगे यांनी केली. या वेळी राजेश जऱ्हाड,महादू गीते, श्रीरंग जऱ्हाड, भगवान सावंत, कैलास दुधानी, रामेश्वर नागवे, नंदू दाभाडे, विलास खैरे, कैलास खैरे यांच्यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती