अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासन शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करेल – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

80

जालना । अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासन शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बदनापूर तालुक्यातील अंबडगाव,धोपटेश्वर, लालवाडी, जालना तालुक्यातील जामवाडी, पानशेंद्रा व अंबड तालुक्यातील अंतरवाला, गोलापांगरी, वडीगोद्री येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांची सहानुभूतीपूरक चौकशी करून त्यांना दिलासा दिला.
यावेळी आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भाऊसाहेब घुगे, अभिमन्यू खोतकर, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, पंडीतराव भुतेकर, विजय दावनगावकर, जालना, बदनापूर, अंबड तालुक्याचे कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे विशेषतः परतीच्या पावसाने मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत बोलताना कृषीमंत्री म्हणाले की, कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी मला केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये. पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल.
कृषी मंत्री पुढे म्हणाले की, राज्यशासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. कालच मंत्रिमंडळ बैठकीत
भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा तसेच ही रक्कम भूविकास बँकेकडून शासनास येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास मान्यता देण्यात आली.
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 69 हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे. तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी एकाच वेळी राज्यातील 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 2500 कोटी रुपये जमा करण्यात आले. टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.