प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक तयार करणार ना. नरेंद्र पाटील : जालना येथे मराठा महासंघ पदाधिकारी संवाद बैठकीत विविध विषयावर चर्चा

15

जालना । प्रतिनिधी – आरक्षणाबरोबरच सत्यधर्म, संस्कृतीचे पालन आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी सदैव तत्पर राहणे, हाच क्षत्रिय मराठा धर्म आहे, अशी शिकवण मराठा हृदयसम्राट स्व. अण्णासाहेब पाटील यांनी आपणा सर्वांना दिलेली असून, ती विसरता कामा नये. धर्म टिकला तरच राष्ट्र प्रबळ बनेल. उद्योग व्यवसायात मराठ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी आपण प्रयत्नशील असून, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक करण्याचे स्वप्न लवकरच पूर्णत्वाकडे जाईल, असा विश्वास मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
जालना येथील अंबड चौफुलीवरील शासकीय विश्रामगृहात रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी आयोजित अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या संवाद बैठकीत ना. नरेंद्र पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख हे होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पडूळ, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, ज्येष्ठ नेते संतोष जेधे, बबनराव गवारे, सरचिटणीस प्रा. संतोष कराळे, ड. युवक जिल्हाध्यक्ष शैलेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील पुढे म्हणाले की, मी कुणा पक्षात असलोतरी, अण्णासाहेबांचा पुत्र या नात्याने चळवळ अधिक महत्त्वाची आहे आणि मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात जाताना राजकीय विचारसरणीचे जोडे बाहेर ठेवूनच समाजहिताचे काम करत असतो. आजच्या तरुणांनी फक्त राजकारण डोक्यात घेण्यापेक्षा मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न समोपचाराने सोडवून घेण्यासाठी अभ्यासपूर्ण पाठपुरावा करावा व सत्यधर्म, संस्कृतीचे अगत्याने पालन करीत स्व. अण्णासाहेब साहेब पाटील यांनी सुरू केलेली पहिली मराठा चळवळ गतिमान करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, स्व. अण्णासाहेब पाटील व विविध महापुरुषांचा आदर्श आहे, तो डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करा. मी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून सदैव तुमच्या सोबत राहील, अशी ग्वाही ना. नरेंद्र पाटील यांनी दिली. यावेळी विविध विषयांवर विचारमंथन झाले.
अध्यक्षीय भाषणात अरविंद देशमुख म्हणाले की, सातत्यपूर्ण काम करणार्‍या चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ मिळाल्यास, काम चांगले वाढू शकते. अशांना प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ड. शैलेश देशमुख म्हणाले की, समाजातील अनेक युवक आता वकिली या क्षेत्रात उतरले आहेत. गरीबीतून ते वकील होतात. नवीन नियमानुसार वकिलीसाठी संगणक अथवा लॅपटॉप आवश्यक आहे. स्वतंत्र कपाटही लागते. सर्व कामे ऑनलाईन झाली आहेत. नव्याने वकीली क्षेत्रात पदार्पण करणार्‍यांसमोर आर्थिक समस्या असते. बँका वकिलांना दारात उभे करत नाहीत. त्यामुळे हे साहित्य घेण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अशा वकिलांना थेट कर्ज देण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली.
प्रारंभी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीला प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पडूळ यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार सुभाष चव्हाण यांनी मानले.
या संवाद बैठकीला आकाश जगताप, विठ्ठल गवारे, बबन शेजुळ, बाळासाहेब देशमुख, कृष्णा यादव, कैलास सरकटे, कैलास ढमाळे, बाळकृष्ण उबाळे, प्रभाकर केदारे, सुनील कदम, अशोक जाधव, श्रीधर पोथरे, सुनील जोगदंड, मंगेश चव्हाण, ड. सुजित मोटे, उमेश सरकटे, गजानन सरकटे, शक्तीसिंग राजपूत, चंद्रकांत भोसले, मुकुंद बोटे, शुभम चव्हाण, अनिल चव्हाण, संतोष साबळे, सुरज गीते, अभिजीत देशमुख, संजय हिवाळे, विजय गुढेकर, बाळू बांगर आदी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.