जालना जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला – पालकमंत्री अतुल सावे;

100

जालना – जिल्ह्याच्या मागील दोन वर्षात विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेवून नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहूजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज जिल्हा क्रिडा संकुल टप्पा 2 आणि जिल्हा नियोजन समिती सभागृहाच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी श्री. सावे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार राजेश राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, पंडित भुतेकर,औदूंबर बागडे, भाऊसाहेब घुगे, अण्णासाहेब चित्तेकर, रविंद्र तौर, मिर्झा अन्वर बेग, भाऊसाहेब गौरे, बाबासाहेब इंगळे, योगेश रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. सावे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात विविध विकासाची कामे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्रिडा संकूलाच्या विकासाचे कामे अनेक वर्षापासून प्रलंबीत होती. क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंची गरज पाहून तसेच पंतप्रधान मोदी यांनी क्रिडा क्षेत्राला दिलेले विशेष महत्व लक्षात घेवून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून टप्पा 1 अंतर्गत आज टेनिस कोर्ट, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, सिंथेटिक स्केटींग रिंग व मिनी स्केटींग रिंग, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ, रिफरबीशमेंट ऑफ एक्झीस्टींग जिम हॉल, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते इत्यादी सुमारे तीन कोटी अठ्ठयाऐंशी लक्ष रुपयांचे कामांचे लोकार्पण तर  टप्पा 2 मधील 400 मीटर सिंथेटीक ट्रॅक, नॅचरल ग्रास फुटबॉल मैदानासह इतर अनुषंगीक बाबीच्या बारा कोटी वीस लक्ष रूपयांच्या कामांचे भुमिपुजन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

तसेच जालना जिल्ह्यासाठी सुमारे 23 कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक असे जिल्हा नियोजन भवन उभारण्यात आले आहे. यामध्ये फर्निचर, सजावट, वातानुकलीत यंत्रणा, सोलार रुफटॉप, डिजिटल ऑडियो कॉन्फरन्स व व्हिडिओ सिस्टीम, जिल्हाधिकारी यांचे दालन, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा दालन अशा सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन भवन आणि क्रिडा संकुलाच्या कामात जिल्हाधिकारी श्री. पांचाळ यांनी विशेष लक्ष देवून हि कामे करुन घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. या कामामुळे जालना जिल्ह्याच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.

 पालकमंत्री म्हणुन मागील दोन वर्षाच्या कालाधीत जिल्हा विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेत नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. पोलिस विभागाला 40 वाहने आणि सीसीटीव्हीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. आरोग्य विभागास मॉड्यूलर शस्त्रक्रिया विभागासाठी निधी उपलब्ध करुन दिला. तर जलजीवन करीता 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. नुकतेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले असून, केंद्र शासनाने याकरीता 160 कोटी निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या कालावधीत डीएमआसीमध्ये सुमारे 52 हजार कोटींची औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार असुन, यामधुन सुमारे 30 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याचे श्री. सावे यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री पांचाळ यांनी या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक केले. तर खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश राठोड यांची यावेळी क्रिडा संकुल आणि जिल्हा नियोजन भवन लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने समयोचित भाषणे झाली.

यावेळी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, दिवंगत उद्योगपती रतन टाटा आणि दिवंगत माजी आमदार बाबा सिद्दीकी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कार्यकारी अभियंता स्मिता पवार, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय गाढवे, खेळाडू, कंत्राटदार आदींचा सत्कार करण्यात आला.

या लोकार्पण कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, सार्वजनीक बांधकाम कार्यकारी अभियंता स्मिता पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय गाढवे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती.