पंजाब नॅशनल बँकेला नुकसान भरपाई सह तक्रार खर्च देण्याबाबत ग्राहक आयोगाचे आदेश

30

जालना । ग्राहकाने मुदतीच्या आत जमा केलेला विमा हप्त्याचा धनादेश विमा कंपनीस विहित कालावधीत पाठवण्यास निष्काळजीपणा दाखवून ग्राहकास विम्याचा लाभापासून वंचित ठेवल्या प्रकरणी ग्राहकास नुकसान भरपाईसह तक्रार खर्च देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पंजाब नॅशनल बँकेला दिले आहेत.
व्यापारी शरद बगडिया यांनी जूनी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स तथा पंजाब नॅशनल बँक आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली ” ओबीसी- ओरिएंटल मेडिक्लेम पॉलिसी 2017″ ही घेतली होती. दि. 20 मार्च 2016 ते 20 मार्च 2020 या कालावधीत शरद बगडिया यांनी बँकेमार्फत सर्व विमा हप्ते नियमित भरले. तथापि पॉलिसी नुतनीकरणाचा हप्ता देय तारखेपूर्वी दि. 13 मार्च 2020 रोजी जमा केला. पंजाब नॅशनल बँकेने विमा कंपनी च्या नावे धनादेश ही तयार केला. मात्र विमा कंपनी च्या पुणे कार्यालयास दि. 29 जुलै 2020 रोजी प्राप्त झाल्यामुळे विमा कंपनी ने पॉलिसी चे नुतनीकरण केले नाही.शरद बगडिया यांना विमा कंपनीने पॉलिसी रद्द झाल्याचे कळवले तर बँकेकडून पॉलिसी हप्ता भरल्याचे सांगण्यात आले. या ञासाने वैतागलेल्या शरद बगडिया यांनी ॲड. महेश धन्नावत यांच्या मार्फत ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. सुनावणी दरम्यान बँकेने केलेल्या निष्काळजीपणा मुळे
सलग विमा पॉलिसीत समाविष्ट नो क्लेम बोनस, टाइम बाँड एक्सक्लुजन, प्री एक्सिस्टिंग डिसीज साठी चे कव्हर अशा सर्व लाभांपासून बगडिया यांना वंचित राहावे लागले. असे ॲड. महेश धन्नावत यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद समजून घेतल्यानंतर तक्रार अर्ज मान्य करत पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकास नुकसान भरपाई म्हणून 25,000 रूपये आणि 3,000 रूपये तक्रार खर्च 60 दिवसांच्या आत द्यावेत न दिल्यास द. सा. द. शे. 10 टक्के व्याज द्यावे असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा नीलिमा संत,सदस्या मंजुषा चितलांगे, नीता कांकरिया यांनी दिले आहेत.