संघर्षाची तयारी असेल तर यश निश्‍चितच-गीता नाकाडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात विद्यार्थी संसदेचे उदघाटन

8

जालना । प्रतिनिधी – आव्हाने पेलण्याची क्षमता, परिश्रम, जिद्द, आत्मविश्‍वास, सातत्य, वेळेचा सदूपयोग यासोबतच संघर्ष करण्याची तयारी असेल तर केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर आयुष्याच्या कुठल्याही परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता, अशा शब्दात जालन्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती गीता नाकाडे यांनी विद्यार्थ्यांना यशाचा पासवर्ड दिला.
शुक्रवारी (दि.4) जालना येथील जवाहरबाग भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात पालक मेळावा व विद्यार्थी संसद उद्घाटन पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विद्यार्थी संसदेचे उद्घाटन श्रीमती गीता नाकाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी धम्मदिप संघाचे सचिव कुसूमाकर पंडीत हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे सदस्य जोहरे, शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार बोटुळे आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलतांना शिक्षण विस्तार अधिकारी गीता नाकाडे यांनी प्रत्येकाला संधी आहे; मात्र ही संधी हस्तगत करण्यासाठी जिद्द हवी, अभ्यासात सातत्य असावे, मिळालेला प्रत्येक क्षण कसा सत्कारणी लागेल, याचे नियोजन असावे, असे ते म्हणाले. यावेळी कुसूमाकर पंडीत यांनी अभ्यासाला शिस्त लावा, शिस्तीचे पालन करा, नियोजन करून ते प्रत्यक्षात येईल, यासाठी प्रयत्न करा, यश तुमचेच, असा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी संसद सचिव म्हणून फैजल शेख, विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून कु. अक्सा शेख यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. विजया कुलकर्णी यांनी तर आभार सर्जेराव खरात यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षक वृंद आर. एस. गाजरे, एच.डी. महाजन, एच.एस. सिरसाठ, व्ही.एन. गायकवाड, रमेश जाधव, हरिदास गाडगे, ज्ञानेश्‍वर मारकड यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थींनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.