ज्येष्ठ नागरिकांनी आपली आवड जोपासून जीवनामध्ये आनंद निर्माण करावा – प्रा. बडवणे

7

जालना । प्रतिनिधी – समाजातील सर्व तरूण-तरुणीमध्ये आपल्या वडिलधार्‍या ज्येष्ठ नागरिकांविषयी सहानभुती असणे आवश्यक आहे. ज्येष्ठांच्या समस्याविषयी जनजागृती करून देण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला जात असतो. तरी ज्येष्ठ नागरिकांनी आपली आवड जोपासून जीवनामध्ये आनंद निर्माण करावा, असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. रेणूका बडवणे यांनी केले.
जालना समाज कल्याण विभागाच्यावतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस कार्यक्रमाचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख तर प्रमुख पाहूणे म्हणून जालना ज्येष्ठ नागरिक मंचाचे महासचिव धर्मा खिल्लारे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कंकाळ, प्रा. मधुकर जोशी, बाबुराव सतकर यांच्यासह सहायक आयुक्त अनंत कदम, सहायक लेखाधिकारी गुलाब चव्हाण आदिची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सूरूवात महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन व उपस्थितांचे स्वागत करून झाली. त्यांनतर प्रा. मधुकर जोशी यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या विषयी माहिती सांगून त्याबाबत समाजामध्ये जनजागृती करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे नमुद केले. श्री. कंकाळ यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरामध्ये विरंगुळा केंद्र उभारण्याबाबत महापालिका प्रशासनाला विनंती केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यालय अधीक्षक अतिश ससाणे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी ज्येष्ठ नागरिक अधिनियम व मुख्यमंत्री वयोश्री योजना तसेच मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजेनेचा लाभ घेण्याचे पात्र लाभार्थ्यांना आवाहन करण्यात केले. कार्यक्रमास परिसरातील इतर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.