जालना | प्रतिनीधी – जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासनाच्या विद्यार्थी प्रवेश प्रक्रिये अंतर्गत कॅपराऊंड मध्ये समावेश झाला असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आ. कैलास गोरंटयाल यांनी मागील चार वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यानंतर जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रवेश प्रक्रिये अंतर्गत शासनाच्या कॅपराऊंड मध्ये समावेश करण्यात आला आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची वेबसाईट घोषित केली असून त्यात जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव अनुक्रमांक ३९१ वर असून त्यात जालन्याचा कोड क्रमांक ९०३३६४ असा आहे. उद्या ४ ऑक्टोंबर २०२४ शुक्रवार पासून ही वेबसाईट विद्यार्थ्यांसाठी खुली होणार असल्याचे आ. कैलास गोरंटयाल यांनी सांगितले. या वेबसाइट वर महाविद्यालय निहायविद्यार्थी प्रवेश क्षमता दिसणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत केंद्र शासनाचा प्रवेशाचा कोटा १५ टक्के तर राज्य सरकारचा कोटा हा ८५ टक्के इतका असतो. ही प्रवेश प्रक्रिया राबवतांना विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम नोंदविण्यात येणार असून त्यांची गुणवत्ता व पसंतीक्रम यानुसार प्रवेश निश्चित होईल व त्यानंतर आठ दिवसात महाविद्यालयात विद्यार्थी येण्यास सुरुवात होईल. दरम्यान, जालन्यात नव्याने सुरू होत असलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जालना शहरासह जिल्हा व परिसरातील सर्वसामान्य जनतेला मोफत उपचारासाठी आणि वैद्यकीय संशोधनासाठी मोठी मदत होईल असा विश्वास आ. कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.