मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर पोलिस अधीक्षकांनी जालन्यात डिजे वाजवण्यास दिली परवानगी, शिवसेना युवानेते अभिमन्यू खोतकर यांची माहिती

10

जालना । प्रतिनिधी – मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जालन्यात डिजे वाजवण्यास परवानगी आज दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान दिलीय. नियमांच्या चौकटीत राहून जालन्यात नवरात्र उत्सवात रात्री 10 वाजे पर्यंत डिजे वाजवण्यास परवानगी देण्यात आलीय. डीजेच्या कर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वृद्ध नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र युवकांचा डीजे वाजवण्याचा हट्ट असल्याने जालना शहरातील काही युवकांनी शिवसेना युवा नेते अभिमन्यू खोतकर यांची भेट घेत त्यांना जालन्यात डीजे वाजवण्यास पोलिसांकडून परवानगी मिळवून द्यावी अशी विनंती केली. त्यानुसार अभिमन्यू खोतकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मा अनंत कुलकर्णी व सदर बाजार पोलिसांची भेट घेत त्यांच्याकडे जालन्यात डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि जालन्याचे पोलिस अधीक्षक यांचा फोन वरून संवाद घडवून आणला. अखेर नियमांचे पालन करून जालन्यात डीजे वाजवण्यास पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती शिवसेना युवानेते अभिमन्यू खोतकर यांनी दिलीय. यावेळी अर्जुन खोतकर समर्थक शेख नजीर माजी नगरसेवक महेश दुसाने गोपाल काबलिया अभिजीत काबलिया यासह डीजे चालक व शिवसेना युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते