जालना । प्रतिनिधी – बौध्द समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले विकास लहाने यांच्या उपोषणाची शासनाने दखल घेतली नसल्याने मंगळवार दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता तिव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी समाजातील सर्वच पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीकांची उपस्थिती होती.
विकास लहाने यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने आज आंबेडकरी समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं.
भिमा कोरेगाव प्रकरणातील व इतर न्याय हक्कासाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या इतर प्रमुख मागण्यांसाठी बौध्द समाजातील आंदोलन विकास लहाने यांनी 19 सप्टेंबर 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलंय. परंतु त्यांच्या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आज बौध्द समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करतांना पहाला मिळाला. सरकार बौध्द समाजाच्या मागण्याकडे दुलक्ष करीत असल्याच्या आरोप आंदोलकांनी केला. बौध्द समाजातील व्यक्ती उपोषण करीत असल्यानेच त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं असून इतर आंदोलनाची मात्र सरकार दखल घेत असल्याचंही आंदोलकांनी म्हटलंय. जोपर्यत जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी येणार नाहीत, तोपर्यत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी म्हटलं. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने मध्यस्ती करण्यात आली. अखेल उप जिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांनी आंदोलनकर्त्याचे उपोषणस्थळी येत निवेदन स्वीकारले. यावेळी तहसिलदार छाया पवार यांची देखील उपस्थिती होती. बौध्द समाजाच्या प्रलंबीत प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी एक समिती गठीत करावी अशी मागणी आंदोलक विकास लहाने यांनी केली. एस.सीए. एस. टी मधील वर्गीकरण व क्रिमीलरची अट रद्द करावी, शेतकर्यांना सरसगट कर्ज माफी देण्यात यावी. गायरान धारक शेतकर्यांना सातबारे देण्यात यावे, रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांना 5 लाख रुपये अनुदान देण्यात यावे. बौध्द तरुणांना 50 लाखपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. मोतीबाग तलावात भगवान बुद्धाची मुर्ती बसवण्यात यावी. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला तथागत भगवान बुध्दाचे नाव देण्यात यावे, दादर रेल्वे स्टेशनचे नामकरण चैत्यभूमी करण्यात यावे. यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. यावेळी विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकार्यासह बौध्द समाजातील आंदोलक उपस्थित होते.