देशभरात 124 महाविद्यालये उभारण्याचा केंद्राचा ड्रिम प्रोजेक्ट; ते आयत्या बिळावरील नागोबा असल्याची टिका माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

35

जालना । प्रतिनिधी – केंद्रात आणि राज्यात आमच्या विचारांचं सरकार आहे. केंद्र सरकारच्या ड्रिम प्रोजेक्टमध्ये वैद्यकिय महाविद्यालयाचा समावेश असून देशभरात 124 महाविद्यालये उभारण्याचा केंद्राचा मानस आहे, त्यात महाराष्ट्र राज्यात 14 वैद्यकिय महाविद्यालये सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्राने आठ वर्षापुर्वीच घेतला होता. मुंबई-नाशिक येथील वैद्यकिय महाविद्यालयानंतर आता राज्यातील नऊ वैद्यकिय महाविद्यालयांचा प्रश्‍न निकाला निघाला आहे. यात जालना वैद्यकिय महाविद्यालयाचा समावेश आहे. येथील लोकप्रतिनिधी केवळ बाईट देऊन, कटाआऊट लावून फुकटचे श्रेय घेत आहेत. ते आयत्या बिळावरील नागोबा असल्याची टिका माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी येथे केली आहे.
जालना वैद्यकिय महाविद्यालयाला 100 विद्यार्थी क्षमतेसह सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली. याबाबतीत माहिती देण्यासाठी मंगळवार (दि 1) रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री खोतकर हे बोलत होते. यावेळी भाजपाचे जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अरविंद चव्हाण, अशोक पांगारकर, राजेश राऊत, पंडीत भुतेकर, भाऊसाहेब घुगे, विष्णु पाचफुले, शाह आलमखान आदींची उपस्थिती होती.
खोतकर म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात देशातील डॉक्टरांची संख्या कमी आहे. ती वाढविणे गरजेचे असल्याने तसेच ग्रामीण व आदीवासी भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात 14 महाविद्यालये ही महाराष्ट्र राज्यात सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय आठ वर्षांपुर्वीच घेण्यात आला होता. केंद्राच्या निर्णयामुळे देशातील महाविद्यालयांची संख्या वाढणार आहे. यापुर्वी मुंबई व नाशिक येथील महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती. आता जालनासह इतर जिल्ह्यातील वैद्यकिय महाविद्यालयांना केंद्राने मंजुरी दिली आहे. नविन महाविद्यालयांमुळे एमबीबीएस विद्याथी प्रवेश क्षमतेत आठशे ने वाढ होत आहे.
राज्यातील महायुतीच्या सरकारमधील वैद्यकिय मंत्री असलेले गिरीश महाजन व नंतर हसन मुश्रीफ यांनी सातत्याने राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांच्या मंजुरीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही केंद्रात जे.पी. नड्ढा यांच्याशी चर्चा करुन जालनासह राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. केंद्र आणि राज्यात आमच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मी (अर्जुनराव खोतकर), अरविंद चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे हे सर्व शक्य झाले आहे. आमदार केवळ श्रेय घेण्यात पटाईत असल्याचा आरोपही यावेळी खोतकर यांनी केला. जालना शहर महानगर पालिकेसाठी सोलर पॅनलचा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. तर या महाशयांनी सोलार साठी 100 कोटी मंजुर झाल्याच्या बातम्या छापून आणल्या. 15 कोटी नाट्यगृहासाठी मंजुर झाल्याचे आमदार सांगताहेत तर ते पैसे कुठयं, पत्रकारांनीही शहानिशा करुन वृत्त छापवीत अशा कानपिचक्याही श्री खोतकर यांनी घेतल्या. आमदार पत्रकार परिषद घेतात, प्रेस नोट काढतात त्यामुळे आपल्याला छापावे लागत असेल, आपल्या छापण्याबद्दल कोणतेही दुमत नसल्याचेही खोतकर म्हणाले. विधानसभेत बोलण्यासाठीच पाठवलं जाते. हे फुकटचे श्रेय घेतात आयत्या बिळावर नागोबा आहेत. निर्णय हे सरकार घेत असते, त्यामुळे तुमचे सरकार आले की, तुम्ही आना प्रकल्प नंतर सांगा असा सल्लाही यावेळी खोतकर यांनी आ. गोरंट्याल यांना दिला.