शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

17

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारने सोमवार (दि 30) रोजी स्वीकारला आहे. शिंदे समितीच्या अहवालात सापडलेल्या पुराव्यांची संख्या 54 लाख 81 हजार 400 इतकी असल्याचे एका वृत्त वाहिनीच्या हाती लागलेल्या अहवालातून समोर आले आहे. सार्वजनिक दस्तावेजात कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबीचे पुरावे सापडल्याचे शिंदे समितीच्या अहवालात नमूद असल्याचा दावा वृत्तवाहिनीने केला आहे.
मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात दुसरा अहवाल सरकारला दिला होता. तो दुसरा अहवाल आणि कमिटीने दिलेला तिसरा अहवाल कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात आला होता. हे अहवाल स्वीकारल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथिगृहावर बैठकही पार पडली. या बैठकीला शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि इतर महत्वाचे सरकारी अधिकारी हजर होते.
सन 1986 ते 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत एकूण 37 लाख 47 हजार 150 जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. 24 ऑक्टोबर 2023 पासून ते 21 डिसेंबर 2023 या काळात 43 हजार 974 जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत असं या अहवालात म्हटलं आहे.
शिंदे समितीचा अहवाल समोर आल्यानंतर त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी सरकारला अजून किती पुरावे हवेत असा सवाल त्यांनी विचारला.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीने आपला दुसरा अहवाल डिसेंबर 2023 मध्ये शासनास सादर केला होता.
हा अहवाल सादर करताना समितीने पूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले. विविध जिल्हाधिकारी त्यांच्या इतर समित्या इतर अधिकारी यांच्याशी चर्चा करून शोधलेले कागदपत्रे आणि त्या अनुषंगिक बाबीवर त्यांना निष्कर्ष आणि जी निरीक्षणे दिसली त्याच्या आधारे अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये 14 शिफारशी शासनास सादर करण्यात आल्या होत्या. या शिफारशींवरील कार्यवाहीबाबत विविध विभागांना आजच्या बैठकीत निर्देश देण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने प्रमाणित केलेल्या तथ्य आणि आकडेवारीवरून महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीचे कागदोपत्री व पुरावे सापडलेले आहेत. त्याची संख्या 54 लाख 81 हजार 400 इतकी आहे.