मुंबई । सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी स्वराज्य मिळवले, आता त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साथीने सुराज्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा यंदा प्रथमच राज्य शासनाने घेतली होती. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यस्तरीय तीन आणि प्रत्येक जिल्ह्यातून एका सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले.
समाजात चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मंडळाचा गौरव करणे हाच उद्देश ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांची साथ असणे आवश्यक आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली, यामागचा उद्देश हा समाजातील एकात्मता टिकून राहावी असाच होता. आजच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक प्रश्न मांडण्याबरोबर समाजाला दिशा आणि विचार देण्याचे काम करीत आहेत. देशभक्ती, राष्ट्रउन्नती आणि राज्याची प्रगती दाखविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साकारण्यात येणारे देखावे. यावर्षी प्रथमच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आणि या स्पर्धेत राज्यातील ३५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.
आज राज्यभरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत. आज उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी साकारण्यात येणाऱ्या देखाव्यातून समाजातील समस्या मांडण्याबरोबर सामाजिक प्रबोधन करण्याचे काम अविरत करत असतात. यावर्षी सुद्धा नदी संवर्धन, शिक्षण, पर्यावरण यासारखे विषय मांडून समाजाला दिशा दिली असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर म. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार यावेळी देण्यात आले.
यावेळी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,उपसचिव विद्या वाघमारे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, आदी उपस्थित होते.