प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गाढवे यांनी स्वीकारला पदभार; जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलण्याची ग्वाही

11

जालना । प्रतिनिधी – प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून संजय गाढवे यांनी शुक्रवार (दि. 27) रोजी पदभार स्वीकारला. क्रीडा क्षेत्रातील मरगळ दूर करून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलण्यासह खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अरविंद विद्यागर यांच्याकडून प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार संजय गाढवे यांनी स्वीकारला. यावेळी स्टाफसह विविध क्रीडा संघटनांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडूळ, शेख इस्माईल यांनीही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. प्रसाद हे उपस्थित होते. यावेळी श्री. गाढवे पुढे म्हणाले की, खेळामुळे आरोग्य सुदृढ बनते. मात्र, आजघडीला युवा पिढी सोशल मीडियात गुरफटली आहे. त्यामुळे क्रीडांगणे ओस पडू लागली आहेत. त्यांना मैदानाकडे आकर्षित करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील. क्रीडांगणाचा विकास करून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाईल. खेळाडू आणि जनतेने आमच्याकडे येऊन मोकळेपणाने क्रीडा समस्यासंदर्भात आपले म्हणणे मांडावे, क्रीडा संदर्भात कोणतेही प्रश्न अथवा अडचणी असतील तर आपल्या 7821852144 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. प्रत्येकाला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आपलेसे वाटावे, यादृष्टीने वातावरण निर्मिती आणि जनसंवादाला प्राधान्य देऊन या कार्यालयाकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. अरविंद देशमुख म्हणाले की, संजय गाढवे यांच्याकडून निश्चितच क्रीडा चळवळीला प्रोत्साहन मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर संजय गाढवे यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. संजय गाढवे हे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून जालना येथे रुजू होण्यापूर्वी भोकरदन-जाफराबाद तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. या तालुक्याचा पदभारही त्यांच्याकडे कायम राहणार आहे. श्री. गाढवे हे सन 2001 मध्ये निवड मंडळामार्फत क्रीडा प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना पहिली पोस्टिंग नांदेड येथे मिळाली होती. मुंबई, धुळे, जालना, औरंगाबाद येथेही त्यांनी क्रीडा मार्गदर्शक म्हणून कर्तव्य बजावलेले आहे. नांदेडचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.
संजय गाढवे यांनी राष्ट्रीय स्तरावरील 20 जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहभाग नोंदवून विविध पारितोषिके पटकावलेली आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए. बीपीएड झालेले असून, त्यांनी पंजाबमधील पतीयाळा येथील येथील नेताजी सुभाष बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्मध्ये एक वर्ष कालावधीचा डिप्लोमा केलेला आहे. प्रशिक्षण एवढे कठीण असते की, अर्धवट सोडून जावे की काय, असे वाटू लागले होते, असे त्यांनी प्रशिक्षणाचे अनुभव सांगताना विषद केले. क्रीडा चळवळ यापक प्रमाणात रुजविण्यासह तालुका स्तरावरील क्रीडांगण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.