जाफराबाद । प्रतिनिधी – तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक गावावर रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. याविषयी स्थानिक प्रशासनाने खुलासा करून जनतेत निर्माण झालेले भीतीचे वातावरण कमी करावे.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी जाफराबाद च्या तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 18 सप्टेंबर रोजी कुंभारी येथील भारत मोरे व विष्णू जंजाळ यांच्या घरावर धाडसी दरोडा पडला होता, त्यातील संशयितास ग्रामस्थांच्या मदतीने धाडसी युवकांनी एकास पकडले होते तर 3 जण फरार झाले होते. आरतखेडा येथील शेतमजूरी करणार्या महिलेच्या गळ्यातील पोत तोडून पळ काढला होता.
जाफराबाद शहरातही भरदिवसा अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत, मागिल काही महिन्यांपूर्वी अनेक व्यापार्यांचे गोडाऊन फोडून धान्य लंपास केले आहेत.काही शेतकर्यांच्या बैलजोड्या चोरीस गेल्या आहेत.वारंवार घडणार्या या चोरीच्या घटनांमधून घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तालुक्यातील अनेक गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरे घिरट्या घालून टेहळणी करत असून, नेमके हे ड्रोन कोण फिरवत आहे? याचा वापर घरफोड्या व चोर्या करण्यासाठी होतो का?असे एक ना अनेक प्रश्न असून, याविषयी अधिकृत माहिती कोणताच विभाग देत नाही. चोरीच्या घडलेल्या घटना, रात्री अपरात्री फिरणारे ड्रोन यामुळे ग्रामीण भागातील नागरिक रात्र जागून काढवी लागत आहे. त्यामुळे ड्रोन विषयी खुलासा करून नागरिकांत निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी शेख मुजीब, रामदास जाधव, दिलीप लोखंडे, विठ्ठल गोरे यांच्यासह कार्यकर्ते आदी उपस्थित होते.