रोटरी क्लब रेनबोतर्फे गणेशोत्सवात पाच दिवस मधुमेह निदानाचा जागर

32
जालना | प्रतिनिधी –  मधुमेहाचे तात्काळ निदान व्हावे आणि गुंतागुंत निर्माण होण्यापूर्वीच उपचार सुरू करता यावेत, यादृष्टीने रोटरीचे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी इंटरनॅशनलचे डायबिटीज डायरेक्टर डॉ. राजेश सेठीया यांच्या माध्यमातून मधुमेह निदानासाठी रोटरी प्रांताच्या 11 जिल्ह्यात ‘आपकी बार, एक लाख पार’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त बडीसडकवर गणेश भक्तांसाठी मधुमेह निदानाचा जागर सुरू करण्यात आला असून, या ठिकाणी 17 सप्टेंबरपर्यंत मोफत मधुमेह निदान आणि मार्गदर्शन शिबिर सुरू राहणार आहे. गणेश भक्तांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष महेश माळी यांनी केले आहे.
         या पाच दिवसीय शिबिराचा शुभारंभ गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी बडी सडकवरील रुबी हॉस्पिटलसमोर सौ. जमनाबाई शिवरतनजी बगडिया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पन्नालाल बगडिय यांच्या हस्ते आणि रोटरीचे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी डॉ. राजेश सेठीया, क्लबचे अध्यक्ष महेश माळी, सचिव गौरव करवा, डॉ. दीपक मंत्री, डॉ. आरती मंत्री, डॉ. नितीन खंडेलवाल, अभय मेहता, अनुप जिंदल, डॉ. प्रतिभा श्रीपत, मधुलता भक्कड, नितीन अग्रवाल, सरला सेठिया, केतन शाह, डॉ. सुमित्रा गादिया, आलोक गडोदीया, संतोष तिवारी, जयेश पहाडे आदींची उपस्थिती होती.
       यावेळी डॉ. सेठीया म्हणाले की, बडी सडकवर गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांनी या शिबीरात अवश्य मधुमेह निदान तपासणी करून घ्यावी. फक्त एका मिनिटात निदान होते. अनेकांना मधुमेह असल्याची जाणीव नसते. वेळीच निदान झाल्यास मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. कुणी प्री-डायबेटिक असल्यास चार-पाच वर्षांनी मधुमेह रुग्ण म्हणून रूपांतर होते. वेळीच निदान आणि उपचारानंतर त्याला मधुमेह रुग्ण होण्यापासून वाचविता येऊ शकते. ही बाब विचारात घेता, प्रत्येकाने मधुमेह निदान करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी महेश माळी यांनी उपक्रमाचा उद्देश विशद केला. दररोज सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार असून, दिवसभर रुबी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जात आहे.  गणेश भक्तांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पहिल्याच दिवशी या ठिकाणी 336 जणांनी मधुमेह तपासणी करून घेतली.