जालना । केंद्र आणि राज्य शासनाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षांसाठी भटके विमुक्त जाती- जमाती, मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महा ज्योती तर्फे मोफत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांच्या कडे केली आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी मंञालयात शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहिते यांच्या समवेत
ना. सावे यांची भेट घेऊन भाऊसाहेब घुगे यांनी चर्चा करत दिलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे, सारथी व बार्टी या संस्था अभियांत्रिकी सेवांसाठी मोफत प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे हित साध्य करत आहेत. या संस्थांच्या धर्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हित साध्य करण्यासाठी स्थापन झालेल्या महा ज्योती ने स्वायत्ततेच्या नावाखाली आपली भूमिका वेळोवेळी बदलेली दिसते असा आरोप भाऊसाहेब घुगे यांनी केला. महा ज्योती विद्यार्थी संघर्ष समितीने आपल्या कडे या बाबत निवेदन दिले. असे नमूद करत भाऊसाहेब घुगे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांत मागासवर्गीय समाजातील अभियंत्यांची संख्या वाढविण्यासाठी महा ज्योती च्या माध्यमातून महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस या परिक्षांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे गरजेचे असून मागासवर्गीय कल्याण मंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन महा ज्योतीस निर्देश द्यावेत व परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्या भाऊसाहेब घुगे यांनी केल्या आहेत.