जालना – किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2023-24 (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाकडुन दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यातील नोंदणीकृत शेतकर्यांची ज्वारी खरेदी पुर्ण न झाल्याने, ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी. या शेतकर्यांच्या मागणीनुसार पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम व सर्व मंडळाने या प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केल्यावर त्यांनी केंद्र शासनाकडे व्यक्तिश: पाठपुरावा करुन महाराष्ट्रातील शेतकर्यांना ज्वारी खरेदीसाठी दि.30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळवुन दिली आहे. त्यामुळे शेतकर्यांना हमी भाव योजनेचा लाभ होणार असून शेतकर्यांना ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळुन आर्थिक फायदा होईल. असे जिल्हा पणन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.