गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ

20

जालना । प्रतिनिधी – जायकवाडी प्रकल्प अर्थात नाथसागर जलाशय 97.30 टक्के क्षमतेने सोमवार दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजता भरला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात होणार्‍या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक बघता आज दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी ठिक 12 ते 1 वाजेदरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 3144 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे. कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये, यासाठी गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांनी सतर्क राहावे तसेच चल- मालमत्ता, चिजवस्तू, वाहने, जनावरे, पाळीवप्राणी व शेतीची अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी पाठवावेत. पुरापासून सावध राहावे, आणि धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणार्‍या पूर विसर्गाबाबत व सदरील इशा-याचे गांर्भीय लक्षात घेता नागरिकांच्या जिवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ कराव्यात. अशा सुचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या आहेत.
खडकपूर्णा प्रकल्पातुनही पाण्याचा विसर्ग
खडकपूर्णा प्रकल्पाची एकुण 2 वक्रद्वारे 30 से.मी.ने उघडली असून नदीपात्रात 3599.78 क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तरी धरणाखालील नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांनी सतर्क राहावे तसेच चल- मालमत्ता, चिजवस्तू, वाहने, जनावरे, पाळीवप्राणी व शेतीची अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी पाठवावेत. पुरापासून सावध राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.