खेळ व खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा विभाग सदैव तत्पर-विद्यागर, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

32

जालना । प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये प्रतिभा आहे. ते नक्कीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जालन्याचा नावलोकिक करणार याची खात्री असून, खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा विभाग सदैव तत्पर असल्याची ग्वाही जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले, अध्यक्षस्थानावरून श्री. विद्यागर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रा. विजय कमळे, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीड़ा अधिकारी आरती चिल्लारे, अशोक पडुळ, राष्ट्रीय पंच सचिन आर्य, फईम खान, राष्ट्रीय पंच मयूर पिवळ, सचिन गादेवाड, राहुल ढाकने, ज्ञानेश्वर मोरे, प्रांजल पिवळ यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अरविंद देशमुख यांनी शालेय क्रीडा स्पर्धेच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत क्रीडा शिक्षकांकडून त्रुटी होत असून खेळाडूंना होणार्‍या त्रासाकडे सर्वांचे लक्ष वेधले. तसेच पुढच्या वर्षी असे प्रकार टाळण्यासाठी सर्व शालेय क्रीडा शिक्षकांना क्रीडा कार्यालयामार्फत प्रशिक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते तायक्वांदो आणि योगाचे उद्घाटनीय सामने खेळविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजळ पिवळ यांनी केले तर मयूर पिवळ यांनी आभार मानले.