सार्वजनिक गणेश मंडळांसह घराघरात ‘श्रीं’चे आगमन

11

जालना | प्रतिनिधी – गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात शनिवारी (दि 7) रोजी जिल्हाभरात सार्वजनिक गणेश मंडळांसह घराघरात ‘श्रीं’चे आगमन झाले. जिल्ह्यातील नेते मंडळींनी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केलेली होती. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या घरी सहपरिवार तांडव ढोलपथकाच्या दणदणाटात बाप्पाचे आगमन झाले. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, भाजपाचे जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांच्या घरी तर शिवसेना (शिंदे गट) मंठा तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या थाटात बाप्पा विराजमान झाले. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेशभक्तांचा उत्साह प्रकर्षाने दिसून आला. ढोल, ताशे, डिजे, लेझीम, पारंपारिक वेषभुषेत जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्त्यांवर बाप्पाच्या मिरवणुकीने लक्ष वेधले होते. जालना शहरातील मानाचा गणपती श्री नवयुवक गणेश मंडळ येथे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या परिवाराच्या वतीने श्रींची स्थापना व पुजन करण्यात आले. प्रसंगी सौ. संगीता गोरंट्याल, अक्षय गोरंट्याल, प्रनोती गोरंट्याल यांची उपस्थिती होती. श्रीगणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी तसेच दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवाच्या काळात विविध गणेश मंडळाकडून लोकजागृती, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जालना शहरात यंदा गणेश फेस्टीवल व श्री गणेश महासंघ यांच्यावतीने क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.