जालना । प्रतिनिधी – अतिवृष्टीमुळे पिकं मोठया प्रमाणावर आडवी झाल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकर्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी आ.कैलास गोरंटयाल यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे विशेषतः सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी आज दि. 7 सप्टेंबर शनिवार रोजी जालना तालुक्यातील मोतीगव्हाण येथे भेट देऊन शेतकर्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात आजही गुडघाभर पाणी साचलेले असल्याने सोयाबीन आणि कापसाची पिके धोक्यात आली असल्याचे दिसून आले. या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकर्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी आ. कैलास गोरंटयाल यांनी केली आहे.
पिकांच्या नुकसानी शिवाय शेतकर्यांच्या जमिनीचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गोरगरिबांच्या घरांचीही पडझड झाली आहे. या नुकसानीचे देखील पंचनामे करून त्यांनाही आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्यांना पिकांच्या आणि जमिनीच्या झालेल्या नुकसानीचे तसेच घरांच्या पडझडी झालेल्या गरीब कुटुंबांना भरपाई मिळावी यासाठी आपण शासनस्तरावर देखील प्रयत्न करणार असल्याचे आ.गोरंटयाल यांनी स्पष्ट केले. नुकसानग्रस्त शेतकर्यांसह घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना भेट देऊन आ. कैलास गोरंटयाल यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधत भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी जालन्याच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार, राम सावंत, राजेश पवार, सोपान तिरुखे, दत्ता पाटील घुले यांच्यासह गावातील फकीरबा मोहिते, दिलीपराव मोहिते, भगवानराव मोहिते आणि ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.