मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पुर्व तयारी बैठक संपन्न

17

जालना –  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभ मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2024 रोजी साजरा करण्यासाठी पुर्व तयारी नियोजन बैठक दि.5 सप्टेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, तहसीलदार छाया पवार यांची उपस्थिती होती.

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ टाऊन हॉल जूना जालना येथे  स्मृतिस्तंभास पुष्पचक्र वाहुन आदरांजली अर्पण करत दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 8.50 ते 9.30 यावेळेत साजरा होणार  आहे. तरी ध्वजारोहणासाठी पोलिस, गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलिस दल, बँड पथक व प्लाटूनची    समारंभासाठी नेमणूक करावी. गर्दी नियंत्रणासाठी बॅरेकेटींग, बंदोबस्त करण्यात यावा. सर्व नियमांचे शासन परिपत्रक व निर्णयानूसार पालन करावे. ध्वजाच्या रक्षणासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. स्मृतिस्तंभाच्या ठिकाणी रंगरंगोटी, ध्वजस्तंभ व दोरी सुस्थितीत असल्याच्या प्रमाणपत्रासह स्पिकर व माईकची व्यवस्था आणि जिल्हाधिकारी कार्यालयात विद्युत रोषणाई करण्यात यावी. ध्वजारोहण प्रांगणाची व परिसराची साफसफाई करावी. स्मृतीस्तंभाजवळ वॉटरप्रुफ मंडप, सोफे, खुर्ची,  सतरंजी, लाऊड स्पिकर, पोडियम, कॉर्डलेस माईक, पुष्पचक्रे आदि साहित्याची व्यवस्था ठेवावी. स्मारक परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही यासह विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सकाळी 8 वाजता वेळेवर घेवून येण्याची व्यवस्था करावी. राजशिष्टाचारानूसार बैठक व्यवस्था करुन संबंधितांना त्यांचे आसन दर्शवून विराजमान करावे. स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कारासह इतर सर्व व्यवस्थेवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवावे. समारंभाच्यावेळी वैद्यकीय सुविधेसह रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी. अशा सुचना अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. या बैठकीस पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जालना शहर महापालिका यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.