जालना | प्रतिनीधी – जालना शहर व जिल्ह्यातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी श्री जालना गणेश महासंघाच्या वतीने उत्सव काळात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून श्री विसर्जन दिनी महासंघाच्या वतीने शहरातील विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याची माहिती श्री जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी आज गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील हॉटेल अथर्व येथे आयोजित या पत्रकार परिषदेस महासचिव पारस नंद, शिवराज जाधव, तुकाराम मिसाळ, शिवराज विजयसेनानी, रत्नपारखे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना अशोक पांगारकर म्हणाले की, जालना जिल्ह्याची १९८१ मध्ये निर्मिती झाल्यानंतर शहरातील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी मानाच्या गणपतीच्या साक्षीने जालन्यात तत्कालीन नामांकित मल्ल रूपा पहेलवान खरे, शामसुंदर साहनी, मनोहरराव जळगावकर, रामभाऊजी राऊत, बाबुलाल पंडित या मान्यवरांनी एकत्र येऊन जालन्यात श्री जालना गणेश महासंघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून जालन्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरू केलेला हा पायंडा आजही सुरू असल्याचे सांगून पांगारकर म्हणाले की, दि. ७ सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील मामा चौकात गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना आणि श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, पालकमंत्री अतुल सावे, खा.डॉ. कल्याण काळे यांची विशेष उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आ. कैलास गोरंटयाल, माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आ. संतोष दानवे, आ.नारायण कुचे, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, संतोष सांबरे, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विधानसभा प्रमुख भास्करराव दानवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, रिपाईचे प्रदेश सचिव ब्रम्हानंद चव्हाण, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हीड घुमारे, भाजपा प्रदेश सदस्य राजेश राऊत, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जांगडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद, शिवसेना उबाठा पक्षाचे शहर जिल्हाप्रमुख बाला परदेशी, रिपाईचे शहराध्यक्ष अनिल खिल्लारे आणि जालना महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची उपस्थिती राहणार आहे. श्री गणेशोत्सवा निमित्त जालना गणेश महासंघाच्या वतीने महिलांसाठी गणपती अथर्व शीर्ष, प्रभागनिहाय भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कब्बडी स्पर्धा, खुली कुस्ती स्पर्धा, सायकल स्पर्धा आदी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेते किरण भगत व उत्तर महाराष्ट्र केसरी विजेते योगेश पवार यांच्यात कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला आहे. जालना गणेश फेस्टिवलच्या वतीने शहरातील रसिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यामुळे फेस्टिवल आणि जालना गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन करण्यात आल्याचे जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी पत्रकारांनी उपस्थीत केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. जालना शहरातील क्रीडा रसिक आणि जनतेने या कार्यक्रमास उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन देखील शेवटी पांगारकर यांनी केले आहे.यावेळी संजय आटोळे, शिवाजी वेताळ, योगेश काटे,भाऊसाहेब चोरमारे आदींची उपस्थिती होती.