कार्यशाळेत 120 मुलांनी पालकांसोबत बनविल्या शाडू मातीपासून गणेश मूर्ती

9

ईन्नरव्हील होरायझन क्लब व ज्ञान संजीवनी फाउंडेशनचा उपक्रम

जालना । प्रतिनिधी – ईन्नरव्हील क्लब ऑफ होरायझन आणि ज्ञान संजीवनी फाउंडेशन संचलित लिओ स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन गणेश उपक्रमांतर्गत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेश मुर्त्या बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध गटातील 120 मुलांनी पालकांसोबत या कार्यशाळेत स्वतःच्या हाताने श्री गणेश मूर्ती बनविल्या.
सामनगाव रोडवरील ज्ञान संजीवनी फाउंडेशनच्या लियो स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी ईन्नरव्हील क्लब ऑफ होरायझनच्या अध्यक्ष ड. अश्विनी धन्नावत, सचिव ड. पिंकी लड्डा, शाळेचे संचालक डॉ. बळीराम बागल, संचालिका सौ. हर्षदा बागल, स्कूलच्या प्रिन्सिपल गीता मोरे, क्लबच्या पुनम खंडेलवाल, शोभा इंगळे, वैष्णवी मिसाळ, सुहाना रोहरा, पायल अग्रवाल, अंकिता अग्रवाल, सुचिता बगडिया यांची उपस्थिती होती.
5 ते 10, 10 ते 15 आणि पंधरा वर्षापेक्षा पुढील अशा तीन वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. स्वप्निल रगडे यांनी या कार्यशाळेत शाडूच्या मातीपासून श्री गणेश मुर्त्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. 120 विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत श्री गणेश मूर्ती बनविल्या. शेवटी बक्षीस वितरण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून बाल न्याय मंडळाचे न्या. बंडगर यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते क्लबतर्फे सर्व सहभागी विद्यार्थी आणि पालकांना भेटवस्तू तर शाळेतर्फे 5 ते 10, 10 ते 15 या गटासाठी प्रत्येकी चार तर पंधरा वर्षे पुढील गटासाठी वयोमानानुसार पारितोषिके न्या. बंडगर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खरोखरच हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. या निमित्ताने पालकांनी आपल्या मुलांसोबत वेळ घालविता आला आहे. मुलांनीही मातीत खेळून मूर्ती साकारताना एक क्रिएशन आपल्या हातून झाल्याचे आत्मक समाधान लाभेल, असे ते म्हणाले.
यावेळी ड. अश्विनी धन्नावत म्हणाल्या की, आम्ही पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनावर विशेष भर दिलेला असून, त्या अंतर्गत ईन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ जालनाच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी बीज बाप्पा हे अभियान राबवले जात आहे. त्या अंतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून बनविलेले बाप्पाच्या मुर्त्या ना नफा ना तोटा तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सोबत एक कुंडी, माती आणि बिया दिल्या जाणार आहेत. या कुंडीतच बाप्पांचे विसर्जन करावयाचे असून, पुढच्या गणेशोत्सवापर्यंत बीज गणेशाचे झाडात रूपांतर झालेले असेल. या माध्यमातून वृक्षारोपण, संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश आम्ही गणेश भक्तांना देऊ इच्छित आहे, असे ड. धन्नावत म्हणाल्या.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख गीता मोरे, निकिता जायस्वाल, पायल आहूजा, पुनम मिश्रीकोटकर, सुरक्षा गेही आदींनी विशेष परिश्रम घेतले.