आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरु नये, दक्षता बाळगावी -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

16

जालना – मान्सून कालावधीत आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. एखाद्या ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास तेथील नागरिकांपर्यंत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लवकरात लवकर पोहोचून मदत करतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झालेला आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आपत्तीचा सामना करण्यासाठीची साधनसामुग्री सज्ज ठेवावी अशा सुचनाही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिलेल्या आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी आपले मुख्यालय सोडू नये. आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन जावू नये तर दक्षता बाळगावी.

शेती किंवा मालमत्ता नुकसानीचे पंचनामे उपविभागिय अधिकारी आणि तहसीलदार यांनी निकषानूसार करावेत, अशा सूचना ही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या आहेत.

 भोकरदन शहरातील केळना नदीला पूर आल्याने आलापूर परिसरातील पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. नदीलगतच्या 4घरातील 23 लोकांसह त्यांचे नातेवाईक स्थलांतरित झाले आहे. घनसावंगी तालुक्यात बाणेगाव येथे शिवाजी विठ्ठल शिंदे गोदावरी नदीत बुडून मयत झाले आहेत. अंतरवाली टेंभी नजीक पांढरे वस्तीवरील पन्नास जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पाडोळी बुद्रुक येथे पुरात सापडलेले तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.  भुतेगाव ते करडगाव मधील पूल वाहून गेला तर चित्र वडगाव येथील एक पूल वाहून  गेला. मयत जनावरांमध्ये पिंपरखेड येथील 20 कोंबड्या,  पानेवाडी 4 शेळ्या, तीर्थपुरी 26 येथील कोंबड्या,  गुरु पिंपरी येथील 6 शेळ्या, शिंदे वडगाव येथील 2 बैल,  1 गाय व 5शेळ्या तसेच  बहिरेगाव एक गाय यांचा समावेश आहे.

दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी जालना जिल्ह्यात एकूण 107.3 मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण 29 मंडळांमध्‍ये अतिवृष्‍टी झाली असल्‍याची नोंद झालेली आहे. जालना तालुका-  जालना ग्रामीण 150.5 मि.मी. ,  नेर 120.3 मि.मी.,  विरेगांव 137.5 मि.मी.,   पाचन वडगांव 87.3 मि.मी. , बदनापूर तालुका- शेलगांव 71.00 मि.मी. , दाभाडी 81.5 मि.मी.,  भोकरदन तालुका-  भोकरदन 87.8 मि.मी , आन्वा 89.5 मि.मी ,  हसनाबाद 92.8 मि.मी , जाफ्राबाद तालुका-  माहोरा 73.3 मि.मी, परतूर तालुका-  आष्‍टी 127.8 मि.मी ,  सातोना 134.3 मि.मी , मंठा तालुका- तळणी 107 मि.मी , ढोकसाळ 130.5 मि.मी , पांगरी 120.3 मि.मी अंबड तालुका- अंबड 194.8 मि.मी ,  धनगर पिंपरी 151 मि.मी ,  जामखेड 175.8 मि.मी , रोहीलागड 158  मि.मी , गोंदी 131.5 मि.मी , वडीगोद्री 227.8 मि.मी,  सुखापूरी 233.8,  घनसावंगी तालुका-  घनसावंगी 280.8 मि.मी.,  राणी उंचेगाव 251.8 मि.मी.,  तिर्थपूरी 269 मि.मी.,  कुंभार पिंपळगांव 259.3,  मि.मी.,  अंतरवाली 107 मि.मी.,  रांजणी 92.8 मि.मी.,  आणि जांबसमर्थ 167.3 मि.मी. अशी पावसाची आकडेवारी आहे.

जिल्हा प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा क्षमतेने मदत आणि बचाव कार्यात कार्यरत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आपत्ती व्यवस्थापनात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.