जालना । माती, खते ,बी- बियाणे, मूलद्रव्याचे प्रमाण अशा शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासह रासायनिक, सेंद्रिय, आणि जैविक सर्व प्रकारचे खते, बियाणे, कृषी साहित्य एकाच छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून जालन्यात या केंद्राचे उद्घाटन सोमवारी ( ता. 17) जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाच्या रसायन व खत मंत्रालयातर्फे शेतकऱ्यांना सुविधा मिळण्याबाबत उचललेल्या क्रांतिकारी पावला अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशभरात साडेसहाशे केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. जालना शहरातील मामा चौका जवळ सदर बाजार रस्त्यावर असलेल्या संजय फर्टीलायझर्स लगत पारादीप फॉस्फेट लि. च्या सहकार्याने सदर केंद्र कार्यान्वित करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास माकसुवाचे अध्यक्ष अतुल लढ्ढा, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुधाकर कराड, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विशाल गायकवाड, अनिल वाबळे, अजित झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विभागाचे अधिकारी अनिल कुलकर्णी यांनी शासनाने एकात्मिक अन्न व्यवस्थापनावर भर दिला असून सदर केंद्रामार्फत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र आणि माती परिक्षण प्रयोगशाळा यांच्या समन्वयाने तालुका निहाय मूलद्रव्यांची माहिती, प्रमाण, माती ,पाणी परिक्षण, तसेच कृषी तज्ञ नवीन तंत्रज्ञानाबाबत ऑनलाइन मार्गदर्शन करणार असून शेतकऱ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन अनिल कुलकर्णी यांनी केले. माकसुवाचे अध्यक्ष अतुल लढ्ढा यांनी सुविधा केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल असे नमूद करत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अनिल वाबळे यांनी केले तर अजित झंवर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाभरातील विक्रेते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.