जिंतूर येथील शेकडो मुस्लीम समाजातील मतदारांना निवडणूक विभागाची नोटीस; नागरीकांमध्ये संभ्रम

48

जालना । प्रतिनिधी – जिंतूर तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने 30 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात उपस्थित राहून मतदार असल्याचा पुरावा द्यावा अशी नोटीस दोन दिवसांपूर्वी मुस्लीम समाजातीन अनेक मतदारांना देण्यात आली होती. नियम 19 (ख) (दोन) नुसार मुस्लीम समाजातील अनेक मतदारांविरोधात हरकती,आक्षेप घेण्यात आला आहे.
दिलेल्या नोटीसी मध्ये नमूद करण्यात आले की, हरकती घेण्यात आलेल्या मतदारांनी जिंतूर येथील तहसील कार्यालयातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, जिंतूर यांच्या समक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडावे, स्वतः वेळेवर ऊपस्थित न राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून प्रकरण गुणवत्तेनुसार निकाली काढण्यात येईल असे दिलेल्या नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात मुस्लीम मतदारांची गर्दी होती! मुस्लिम समाजातील बहुतांश मतदारांना नोटिसा मिळाल्याने मुस्लिम समाजातील 80 वर्षांच्या महिला-पुरूष मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली. जिंतूरचे सर्व मुस्लीम मतदार 40 ते 50 वर्षांपासून प्रत्येक निवडणूकीत मतदान करत आहेत! मग अचानक या आगामी विधानसभा निवडणुकीत हे बहुसंख्य मुस्लिम मतदार बोगस कसे झाले? असा प्रश्न मुस्लीम समाजाच्या मतदारांकडून विचारला जात आहे? जिंतूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? असा प्रश्न मुस्लिम समाजातून उपस्थित होत आहे. मागील 35 ते 40 वर्षांपासून जिंतूर मतदारसंघातील मुस्लीम समाजाने निवडणूकीत मतदान केले तेव्हा ते मुस्लिम मतदार मूळ होते. मग यावेळेस असे काय झाले आहे की अचानक मुस्लिम मतदार बोगस झाले? जिंतूर मतदारसंघात हे द्वेषाचे राजकारण कोण करतंय? जिंतूर तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने आपले मत कोणाला द्यायचे हा अधिकार हिरावून घेऊ नये असे मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित बुद्धीजीवी नागरिकांचे म्हणणे आहे.
ज्या लोकांनी मुस्लीम समाजातील नागरीकांना मुद्दामहून टार्गेट कृरून आक्षेप नोंदवला त्यांची सखोल चौकशी करावी जेणे करून कोणत्या आधारावर या लोकांनी केवळ मुस्लीम मतदारांना टार्गेट केले याची शहानिशा व्हायला पाहिजे असे स्थानिक नागरीकांची मागणी आहे.