जालना । प्रतिनिधी – हॉकीचे जादुगार, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे भारतीय क्रीडा क्षेत्रात अमुल्य योगदान असल्याने त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळ खेळणेही तेवढेच महत्वाचे असून विविध खेळातूनही करियर करता येते. तरी जिल्ह्यातील युवकांनी विविध खेळांच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर गुरुवार दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी 21 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटातील शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रशांत नवगिरे, विजय गाडेकर, फेरोज अली आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, खेळ हा शारिरीक तंदुरुस्ती व मानसिक स्थैर्य आणि सामाजिक सलोख्याचा महत्वपूर्ण घटक आहे. प्रशासनाने खेळाडूंच्या सोयीसाठी जिल्हा नियोजन समिती तसेच इतर निधीमधून खेळासाठी आवश्यक असणारे साहित्य तसेच इतर गोष्टी देण्यासाठी मागील वर्षीपासून जोमाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील जे खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाचे शिखर पादाक्रांत करावे. जालना जिल्ह्यातील आर्चरी खेळाची खेळाडू तेजल साळवे आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचली आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या खेळाडूंना खेळासाठी कोणतेही सहकार्य लागेल त्याची प्रशासनाकडून वेळोवेळी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. असे सांगून आपल्या जिल्ह्यातील खेळाडू ऑलंम्पिक स्पर्धेपर्यंत पोहचावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणार्या गुणवंत खेळाडूंचा गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पवन कोळी, कृष्णा मुळक, वैष्णवी सोनटक्के, वैष्णवी सोलंकी, ऋषिकेश देशमुख, अमृता शिंदे, मोनिका पवार,तेजल साळवे, हर्षवर्धन इंगळे, ऋतुजा पवार, उत्कर्ष ढाकरे, प्रांजल साळवे, संजिवणी काचेवाड, सार्थक शेळके, निखिल सहानी, ऋतुजा राठोड, मयुरी घाटे, शिवकन्या चवळ, कुणाल राठोड, अक्षय ढेंगळे, सानिका दिवरे, कैलास वीर, रविराज अदे, गौरव चव्हाण, अभिषेक भाकड, आदर्श लोंढे, इशान हिरेमठ, मुकुंद राठी, रोहन वाघमारे, प्रांजल पिवळ, मयूर पिवळ तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील किशोर नावकार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले तर आभार क्रीडा कार्यालयाच्या रेखा परदेशी यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, क्रीडा मार्गदर्शक सिध्दार्थ कदम, आशिष जोगदंड, संतोष वाबळे, हारुण खान, भागवत शेळके आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमास क्रीडा प्रेमी, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.